हजर होण्यास संजयने मागितली मुदत

नवी दिल्ली: आपली कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी हजार होण्यास आणखी काही आठवड्यांचा कालावधी मिळावा; अशी विनंती अभिनेता संजय दत्त याने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल संजयला न्यायालयाने ५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सन १९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोटाशी संबंधित आरोपींकडून संजयने ए. के. ५६ स्वयंचलित रायफल मिळविली होती. त्याबाबत संजयवर दहशतवाद प्रतिबंधक कायद्याखाली खटला दाखल करण्यात आला. दहशतवादी कराव्यात सहभाग आणि कट रचण्यासारख्या गुन्ह्यातून न्यायालयाने संजयची मुक्तता केली. मात्र बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनवली. यापैकी दीड वर्षाचा कारावास संजयने या आधीच भोगलेला असल्याने आणखी साडेतीन वर्ष संजयला तुरुंगात काढावी लागणार आहेत.

संजयकडे सध्या काही चित्रपटांचे काम असून बॉलीवूडमधील सुमारे ७० ते १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर संजयाच्या शिक्षेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.