न्यूयॉर्क दि.१५ – भारतीय अब्जाधीश आणि रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना बँक ऑफ अमेरिकाकडून २०१२ सालासाठी १ कोटी ३० लाख रूपये कॉम्पेन्सेशनपोटी देण्यात आल्याचे बँकेने भागभांडवल दारांना दिलेल्या पत्रकातून जाहीर करण्यात आले आहे. २०११ सालापासून अंबानी या बँकेचे संचालक सदस्य होते मात्र नुकताच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. ८ मे रोजी होणार्याह सार्वजनिक बैठकीनंतर हे पद अंबानी यांच्याकडे राहणार नाही.
गेल्या वर्षात म्हणजे २०११ मध्ये मुकेश अंबानी यांनी या बँकेने संचालक पदासाठी २ लाख ७६ हजार ८१६ डॉलर्स अशी भरभक्कम भरपाई दिली होती. अंबानी स्वतंत्र संचालक म्हणून या बँकेवर नियुक्त केले गेले होते. अंबानी यांच्यासोबत अन्य पाच जणांनीही बॅकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्वांच्या जागी नवीन संचालकांची नेमणूक केली जाणार आहे.
मार्च २०१३ अखेर मुकेश अंबानी यांच्याकडे बँक ऑफ अमेरिकाचे ३१२६५ शेअर्स असून हे शेअर्सही बँकेने कॉम्पेन्सेशनपोटीच दिलेले आहेत असेही बँकेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.