अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांना रोहित पवारांचा सवाल


मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. भाजप नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर आंदोलन केले होते. त्याचबरोबर या प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करून टीका केली होती. पण आता सोशल मीडियातून अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर भाजपने गुळणी धरली असून, रोहित पवारांनी वर्मावरच बोट ठेवले आहे.

रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आणि बोलणाऱ्या भाजप नेत्यांना सवाल केला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करणार की, पाठीशी घालणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.


लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढे आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपाच्या त्या नेत्यांनी सांगावे. फक्त सांगणे पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातले जाईल, यही पुछता है भारत!, असा सवाल रोहित पवारांनी भाजप नेत्यांना ट्विटच्या माध्यमातून केला आहे.


रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट असलेला स्क्रीनशॉट ट्विट करत चिंता व्यक्त केली होती.कथित पत्रकाराला भाजपच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे त्यांच्या चॅटिंगवरुन दिसत आहे. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक असल्याचे रोहित पवार म्हणाले होते.