लखनौ दि. १३ – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मतदारसंघ असलेले अमेठी आणि रायबरेलीत चोवीस तासाच्या आत पुन्हा अखंड वीज देण्यास सुरवात झाली असल्याचे समजते. कालच या दोन्ही फाईव्ह स्टार शहरांत वीज टंचाईचे कारण देऊन चार तास भारनियमन करण्यात आले होते. मात्र यामागील राजकीय हेतू लक्षात घेऊन दिल्लीतून काँग्रेसची जी कडक प्रतिक्रिया उठली त्याची दखल घेऊन हा वीजपुरवठा पूर्ववत २४ बाय ७ म्हणजे चोवीस तास सुरू करण्यात आला असल्याचे समजते.
अमेठी, रायबरेलीत पुन्हा अखंडित वीज
उत्तर प्रदेश वीज महामंडळाने उन्हाळा असल्यामुळे राज्याला अभूतपूर्व वीजटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे राज्याच्या सर्वच महत्त्वाच्या शहरातही भारनियमन करावे लागत असल्याचे कारण देऊन वरील दोन्ही शहरातही भारनियमन लागू केले गेले. मात्र ही दोन्ही शहरे काँग्रेसच्या बड्या नेत्यांची असल्याने त्यामागे राजकीय कारण असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षच त्यामागे असल्याचे थेट आरोपही केले गेले होते.
उत्तर प्रदेशात उन्हाळा वाढल्याने वीजेची मागणीही वाढली आहे. सध्या ११५०० मेगावॉटची गरज असताना राज्याला सर्व थरातून केवळ ८ हजार मेगावॉट वीज मिळते आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी डिपल यांच्या कनौज शहरातही भारनियमन केले जात आहे तसेच ते अमेठी आणि रायबरेलीत केले गेले असे वीज मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए.आर.मिश्रा यांनी सांगितले. मात्र पुन्हा लगोलग या दोन्ही शहरांच्या वीजपुरवठा पूर्ववत कसा केला गेला याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही.
