इन्फोसिसचा नफा पोहोचला २३९४ कोटींवर

नवी दिल्ली दि. १२ – जाणकारांचे सर्व अंदाज चुकीचे ठरवत भारतातील दोन नंबरची माहिती तंत्रज्ञान सेवा निर्यातदार कंपनी इन्फोसिसने तिमाही नफ्यात तब्बल ३.४ टक्के वाढ नोंदविली आहे. यामुळे गतवर्षीच्या याच काळातल्या २३१६ कोटी नफ्यावरून कंपनीचा नफा ३१ मार्च २०१३ च्या तिमाहीत २३९४ कोटी रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. शिवाय कंपनीने जर्मन कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यू ची ऑर्डरही हस्तगत केली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने १०४५४ कोटी रूपयांचा महसूल गोळा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कंपनीचे सीइओ आणि व्यवस्थापकीय संचालक एस.डी. शिबुलाल या संदर्भात माहिती देताना म्हणाले की आमची कामगिरी उत्तम झाली आहेच पण यंदा महसूलातही ६ ते १० टक्के वाढ होईल अशी आमची अपेक्षा आहे. जागतिक अनिश्चतता आणि परदेशी चलनातील सतत असलेली अस्थिरता यामुळे कंपनीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले असले तरी त्यावर मात करून आम्ही चांगली कामगिरी बजावली आहे.

इन्फोसिसच्या निकालांमुळे आज शेअर बाजारात मात्र आय.टी. कंपन्यांचे शेअर घसरले असल्याचे दिसून आले.