पं.रविशंकर यांच्या अखेरच्या अल्बमचे मे मध्ये प्रकाशन

जागतिक कीर्तीचे सतारवादक पं. रविशंकर यांनी केलेले शेवटचे रेकॉर्डिंग येत्या मे मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे समजते. पंडितजींच्या मृत्यूनंतर प्रकाशित होत असलेला हा पहिलाच अल्बम आहे. इस्ट मिटस वेस्ट म्युझिक ने यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

या पत्रकानुसार पं. रविशंकर यांची वयाच्या ९१ व्या वर्षी म्हणजे आक्टोबर २०११ मध्ये विविध रागांतील सात रागांचे अल्बम तयार करण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील चार अल्बम प्रसिद्ध झाले असून त्यांना गतवर्षीच्या बेस्ट वर्ल्ड म्युझिकचे ग्रॅमी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. रविशंकर यांनी हे अल्बम तयार करण्यासाठी त्यांचे दीर्घकाळचे तबला साथीदार तबलावादक तन्मय बोस यांना कॅलिफोर्नियात येण्याचे आमंत्रण देऊन बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांच्या घरातच चार दिवस सतत या सात विविध रागांतील अल्बमचे रेकॉर्डिग करण्यात आले होते.

या सात मधील शेवटच्या तीन अल्बमचे प्रकाशन मे मध्ये केले जाणार आहे.