मुंबई: विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई करणारी राही ही भारताची पहिली पिस्तोल नेमबाज ठरली. दक्षिण कोरियातल्या विश्वचषकात सुवर्णपदकाची गुढी उभारणारी नेमबाज राही सरनोबत बुधवारी रात्री उशीरा मायदेशात परतली. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहीचं जल्लोषात स्वागत करण्यात आले .
विश्वचषकात सुवर्णपदकाची कमाई करणारी राही ही भारताची पहिली पिस्तोल नेमबाज ठरली. राहीने स्पोर्टस पिस्तोल प्रकारात दक्षिण कोरियाच्या कियॉंग किमला हरवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं.
आंतरराष्ट्रीय नेमबाजीतलं राहीचे हे चौथे पदक ठरलं. मूळची कोल्हापूरची असलेली राही २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उदयास आली. त्या स्पर्धेत राहीनं एक सांघिक सुवर्ण आणि एक वैयक्तिक रौप्यपदक पटकावलं होतं. २०११ साली फोर्ट बेनिंगच्या विश्वचषकातही राहीने ब्राँझपदकाची कमाई केली होती. त्यानंतर आता दक्षिण कोरियात थेट विश्वचषकात सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचा पराक्रम राहीने गाजवला. स्वगातासाठी राहीचे आई-वडील, नातेवाईक, प्रशिक्षक अनातोली यांच्यासह मुंबई आणि कोल्हापूरचे क्रीडारसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.