मानवतेचे ‘संभाव्य’ मारेकरी

विसाव्या शतकातील नामवंत, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी वस्तुमान आणि ऊर्जा यांच्या संबंधात सिद्धांत मांडला तेव्हा आपला हा सिद्धांत गैरमार्गाने वापरून काही देश पूर्ण मानव जातीलाच वेठीस धरतील असे त्याला चुकून सुद्धा वाटले नव्हते. परंतु तसा वापर होण्याची चिन्हे दिसायला लागली आणि अमेरिकेने पहिली अणुचाचणी घेतली तेव्हा आइन्स्टाईन ढसाढसा रडला, असे इतिहासात लिहिले गेले आहे. अर्थात आइन्स्टाईनने रडण्याचे काही कारण नव्हते. विज्ञानाचा कोणताही शोध असा चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पद्धतींनी वापरला गेलेला आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीतही तसेच घडलेले आहे. हा शोध जेवढा क्रांतिकारक आहे तेवढाच तो मानवी जातीसाठी घातक सुद्धा आहे. परंतु शेवटी मानवी जातीचा घात आपण करायचाच नाही असे सर्वांनीच ठरवले तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

ही अण्वस्त्रे जेव्हा बेजबाबदार लोकांच्या हातात पडतील तेव्हा मात्र मानवी जातीला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. म्हणून अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडता कामा नयेत याबाबत जबाबदार प्रगत देश पुरेशी दक्षता घेत आहेत. मात्र मानव जातीने बरीच प्रगती केली असल्यामुळे शास्त्रीय संशोधनाच्या बाबतीत अगदीच सुमार पातळीवर असलेल्या कोणाही देशाला अण्वस्त्रे तयार करण्याचे तंत्र प्राप्त व्हायला लागले आहे आणि म्हणूनच मानवी जातीची काळजी करणार्‍या काही संवेदनशील लोकांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला आहे. अशा बेजबाबदार हातांपैकी एक हात म्हणजे पाकिस्तान!

पाकिस्तानसारख्या बजबजपुरीने गांजलेल्या देशाच्या हातात अण्वस्त्रे गेलेली आहेत. आता इराण, इस्रायल हेही देश अण्वस्त्र सज्जतेसाठी धडपड करायला लागले आहेत आणि उत्तर कोरियासारखा कोंडीत पकडला गेलेला देशही अणुचाचण्या घेऊन जगाचा थरकाप उडवायला लागला आहे. उत्तर कोरियाचा नवा अध्यक्ष किम जाँग उन् याने आपल्या हातात अण्वस्त्रे असल्याचे सूचित करून जगाला एकामागे एक इशारे द्यायला सुरुवात केली आहे. अणुबॉम्ब ही जणू एक माकडचेष्टा आहे असे त्याला वाटायला लागले आहे. अणुबॉम्बचे संशोधन ठीक आहे, परंतु अशा बालीश माणसाच्या हातामध्ये अणुबॉम्ब पडला तर हे जग काही महिन्यांच्या आत अणुयुद्धामध्ये गुरफटले जाऊन त्याचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही.

जगामध्ये आजपर्यंत चीन, भारत, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका या देशांनी अणुबॉम्ब तयार केलेले आहेत. परंतु या सर्वांनी अण्वस्त्र निर्मिती केल्यानंतर आपली अण्वस्त्रे पहिल्या वापरासाठी नाही, किंबहुना ती वापरासाठी नाहीतच, असे घोषित केले आहे. अणुबॉम्ब निर्माण केल्यानंतर त्याविषयीचे तत्व प्रसिद्ध करणे हे सभ्यतेचे लक्षण आहे आणि ते लक्षण दाखवीत भारतासहित सर्व जबाबदार राष्ट्रांनी आपल्याकडचा अणुबॉम्ब हा वापरासाठी नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र आपल्यावर कोणी अण्वस्त्र हल्ला करण्याचे साहस करण्याचा विचार केला तर त्याला आपल्याकडे सुद्धा अण्वस्त्रे आहेत हे कळून अण्वस्त्र हल्ल्याचा विचार सोडून द्यावा लागेल म्हणून आपले अण्वस्त्र आहे.

आपली अण्वस्त्रे प्रतिस्पर्ध्याला धाक बसविण्यासाठी आहेत, वापरासाठी नाहीत, हे अशा डॉक्टट्रिनमधून सांगितलेले असते. त्यामुळे एवढे देश अण्वस्त्रधारी झाले तरी पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या शिवाय कोणत्याही देशाने आपण आपल्या शत्रू राष्ट्रावर अण्वस्त्राचा हल्ला करू, असे म्हटलेले नाही. कारण अणुबॉम्बचा वापर हा केवळ शत्रू देशाला नव्हे तर तो करणार्‍या देशासह सार्‍या मानवतेला शापवत ठरणारा आहे. परंतु पाकिस्तान आणि कोरिया हे दोन बेजबाबदार देश आहेत. पाकिस्तान भारताच्या बाबतीत अणुबॉम्बचा वापर करण्याच्या डरकाळ्या फोडते तसे उत्तर कोरियाने आता थेट अमेरिकेलाच अणुबॉम्बची धमकी द्यायला सुरुवात केली आहे. खरे म्हणजे उत्तर कोरियाची तेवढी ताकद नाही. अमेरिकेपुढे तर उत्तर कोरिया म्हणजे चिलटासारखा आहे. गेली ५० वर्षे तणावग्रस्त असलेल्या या साम्यवादी देशात भौतिक आणि औद्योगीक प्रगती नाममात्रच झाली आहे. त्याला प्रगती करायची आहे. दक्षिण कोरियाशी बरोबरी करायची आहे. परंतु सातत्याने अणुबॉम्बच्या धमक्या देऊन बड्या देशांनाच आपल्या कह्यात आणण्याची माकडचेष्टा हा छोटा देश करत आहे.

आज तर या देशाच्या अध्यक्षांनी आपल्या देशातल्या परकीय नागरिकांना देश सोडून देण्याचा आदेश दिला. कदाचित उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात अण्वस्त्रासहित लढाई झाली तर त्या लोकांनी कोरियात राहणे योग्य नाही असा इशारा किम जाँग उन् यांनी दिला आहे. अद्याप तरी त्याचा हा इशारा जगाने गांभीर्याने घेतलेला नाही. परंतु शेवटी तो अविचारीच निघाला आणि त्याच्या मेंदूवर जर बेजबाबदारपणा सवार झाला तर तो काहीही करू शकतो आणि म्हणून जगाने सावध होण्याची गरज आहे. या जगामध्ये तिसरे महायुद्ध होईल की नाही माहीत नाही, परंतु ते झालेच तर त्या महायुद्धाच्या आठवणी सांगायला कोणीच जिवंत राहणार नाही आणि मानवी जातीचा असा गंभीर विनाश करणे हे किम जाँग उन्सारख्या मूर्ख माणसाच्या हातात आहे, हे मानवतेचे दुर्दैव आहे.