मोदींचा यूपीएवर हल्लाबोल, ममतांवर स्तुतीसुमने

कोलकाता: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोलकात्यातील उद्योजकांना संबोधित करताना, यूपीए सरकावर हल्लाबोल केला. यूपीए सरकार विकासाची कामं करत नाही, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

राजकीय स्वार्थासाठी सरकार विकासकामांबाबत चाल- ढकल करत आहे, असे मोदी म्हणाले. याशिवाय वाढत्या महागाईकडे सरकारचे लक्षच नसल्याचेही मोदींनी नमूद केले.

मोदींनी एकीकडे सरकारवर तोफ डागली, तर दुसरीकडे त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर स्तुतिसुमने उधळली. पश्चिम बंगालमध्ये वाममोर्चाने ३२ वर्षांपासून खोदलेला खड्डा आता ममता सरकार भरत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसने खोदलेला खड्डा भरण्यास आम्हाला १० वर्ष लागली,
असे मोदी म्हणाले.

भारताच्या पूर्वेकडील राज्यांचा विकास करायचा असेल, तर त्याची सुरुवात पश्चिम बंगालपासून व्हायला हवी, असेही मोदींनी सांगितले. मात्र, केंद्र सरकार याबाबत भेदभाव करत असल्याची टीकाही मोदींनी केली.