धोनीने कडकनाथ खरेदी केलेल्या पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्ल्यू

फोटो साभार कलिंग टीव्ही

मध्यप्रदेशातील झाबुआ येथील रुडीपाडा पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने कडकनाथ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असल्याचे समजते. टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने याच फार्म वरून गेल्या नोव्हेंबर मध्ये २ हजार कडकनाथ कोंबडी पिले पाळण्यासाठी विकत घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी येथील काही कोंबड्या मेल्याने भोपाळ येथे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले होते त्यात या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे सिद्ध झाले. त्या नंतर त्वरित नगरपालिका अधिकारी आणि पशु विभाग अधिकारी या फार्मवर सुरक्षा किट घालून पोहोचले. येथे कोंबड्या मारण्याचे काम सुरु झाले असून मेलेल्या व जिवंत कोंबड्या जमिनीत खोल गाडल्या जात आहेत असे समजते. किमान १ किमी परिसरात बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व ते उपाय केले गेले आहेत असेही सांगितले जात आहे.

कडकनाथ जातीच्या कोंबड्या काली मासी नावानेही ओळखल्या जातात. काळ्या रंगाच्या या कोंबड्यामध्ये औषधी गुण असतात. झाबुआ भागात या कोंबड्या प्रामुख्याने सापडतात आणि त्यांच्यासाठी जीए टॅग म्हणजे भूगोलिक ओळख प्रमाणपत्र घेतले गेले आहे. या कोंबड्यांच्या मांसात प्रथिने अधिक प्रमाणात असतात, कॉलेस्टरॉल कमी प्रमाणात असते असे सांगितले जाते.