बंगळूर, दि.९ -भाजपने कारवाईचा बडगा उगारताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे खासदारपुत्र बी. वाय. राघवेंद्र यांना पक्षातून निलंबित केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकांना अवघा चार आठवड्यांचा कालावधी उरला असताना ही कारवाई करण्यात आली.
येडियुरप्पा यांचे खासदारपुत्र भाजपमधून निलंबित
कर्नाटकमधील वजनदार नेते असणार्या येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून कर्नाटक जनता पक्षाची (कजप) स्थापना केली. त्यानंतर राज्यातील सत्तारूढ भाजपमधील अनेक नेते कजपकडे झुकले आहेत. कजपबरोबर असणार्यात येडियुरप्पा समर्थकांवरील कारवाईला आता भाजपने वेग दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आज राघवेंद्र आणि शिवकुमार उदासी या दोन खासदारांना भाजपमधून निलंबित करण्यात आले. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
राघवेंद्र शिमोगा मतदारसंघातून तर शिवकुमार हावेरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. कर्नाटकात ५ मे यादिवशी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आपले सदस्य असणार्याय येडियुरप्पा समर्थकांच्या विरोधात भाजपकडून आक्रमक पवित्रा स्वीकारला जाण्याची चिन्हे आहेत.
