मुशर्रफच्या वाटेत अनेक काटे

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी आठ वर्षांच्या विजनवासानंतर मायदेशात परतून निवडणुकीत पदार्पण करून देशाचे भवितव्य बदलण्याचा मोठाच निर्धार केला आहे पण  त्यांच्या या मार्गात अनेक काटे पसरलेले आहेत. त्यांना देशाचा पंतप्रधान होणे तर दूरच पण खासदार तरी होता येईल की नाही याबाबत शंका येत आहे. त्यांनी तीन ठिकाणाहून अर्ज दाखल केला होता पण त्यांचे पहिले दोन अर्ज फेटाळले गेले, छाननीत रद्द झाले. शेवटी तिसरा अर्ज मंजूर झाला आणि ते निवडणुकीत उतरण्यास पात्र ठरले आहेत. पण दरम्यान त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका याचिकेची सुनावणी सुरू झाली आहे. हा खटला देशद्रोहाचा असल्यामुळे मुशर्रफ यांनी त्याचा निकाल लागेपर्यंत देश सोडू नये असा आदश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मुशर्रफ यांनी २००७ साली देशात आणीबाणी पुकारून देशद्रोह  केला असे या खटल्यातल्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर ते देश सोडून जाणार नाहीत याची काळजी घेण्याचा आदेश देशाच्या गृहखात्याला दिला आहे.    त्यांनी कराचीतून आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो नामंजूर झाला म्हणून त्यांनी दुसरा अर्ज पंजाबातून सादर केला पण त्याचीही गत तीच झाली. शेवटी  देशाच्या अती उत्तरेकडच्या एका मतदारसंघातला त्यांचा अर्ज मंजूर झाला. अगदी अफगाणिस्तानच्या सीमेवर हा मतदारसंघ आहे. या चित्राळ मतदारसंघात त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात बरीच विकास कामे केली आहेत असा त्यांचा दावा आहे. या पर्वतीय प्रदेशाला देशाच्या अन्य भागांशी जोडणारा बोगदा त्यांनी पुरा केला म्हणून या भागातली जनता त्यांच्या मागे उभी असल्याचा त्यांचा दावा आहे.

हा दावा कितपत खरा आहे याबाबत शंका आहेत पण प्रत्यक्षात त्यांच्या कराची येथील आगमनाच्या वेळी त्यांच्या स्वागताला मोजकीच माणसे हजर होती. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि त्या संबंधात ते कराची येथील न्यायालयात हजर झाले तेव्हा त्यांच्यावर एका अज्ञात इसमाने चप्पल फेकली होती. जनतेत मुशर्रफ यांच्या विषयी द्वेष असल्याचे दिसत आहे. पण तो कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी १९९९ सालचे कारगील युद्ध  वापरत आहेत. हे युद्ध आपण भारतावर लादले होते आणि त्यात आपला विजय झाला नाही तरी आपले त्यामागचे  हेतू साध्य झाले आहेत असा त्यांचा दावा असन तो करून ते पाक जनतेची मते आजमावत आहेत.