महिलांना समान न्याय हवा: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: भारताच्या विकासासाठी महिलांना समान न्याय व हक्क असणे गरजेचे आहे. तसेच स्त्रीशक्तीचा योग्य आदर आणि वापर करणे गरजेचे आहे, असे मत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) व्यक्त केले.

भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या (फिक्की) महिला शाखेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की भारतातील बहुतांश महिला केवळ गृहिणी आहेत, असे पश्‍चिमेकडील देशांचे मत आहे. परंतु, मी या मताचा नाही. भारतीय महिला घर सांभाळण्यासह पतीच्या व्यवसायातही मदत करतात. सामाजिक विकासात महिलांचे योगदान बहुमूल्य आहे. मात्र दुसरीकडे स्त्रीभ्रुणहत्येचे प्रमाण वाढत
आहे. गुजरातमध्येही ते जास्त आहे. ही चिंतेची बाब आहे. आपल्याला जर प्रगतिशील भारत घडवायचा असेल तर स्त्रीशक्तीचा योग्य वापर आणि आदर करायला हवा.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच भारतीय उद्योग महासंघाला (सीआयआय) संबोधित केले होते. त्यानंतर मोदींनी फिक्कीच्या महिला शाखेला संबोधित केले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची तुलना करण्यात येत आहे.

सीआयआयफच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी उपस्थितांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली होती. हा पायंडा कायम राखत मोदींनीही उपस्थित महिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.