विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी; तिसरा कसोटी सामना अनिर्णीत


सिडनी – हनुमा विहारी आणि अश्विन यांनी दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून तब्बल २५९ चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखत, बॉर्डर गावसकर मालिका १-१ बरोबरीत सोडली आहे. फलंदाजी करताना विहारी-अश्विन दोघेही दुखापतग्रस्त झाले होते. दोघांनी अशा परस्थितीतही संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. सहाव्या गड्यासाठी विहारी-अश्विन यांनी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली.

विहारीने पाचव्या दिवशी फलंदाजी करताना १६१ चेंडूचा सामना केला. तर विहारीला संयमी साथ देत अश्विनने १२८ चेंडूचा सामना केला. एकवेळ सामना भारतीय संघ गमावेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच या जोडीने संयमी आणि चिवट फलंदाजी करत २५९ चेंडूचा सामना करत भारताचा पराभव टाळला. विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाने पराकाष्ठीचे प्रयत्न केले. कर्णधार पेन याने तर स्लेजिंगचाही वापर केला. पण अश्विन-विहारी यांनी आपला संयम ढासळू देता भारताचा पराभव टाळला. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या संयमी फलंदाजीचे कौतुक होत आहे.

पुजाराच्या साथीने कर्णधार अजिंक्य रहाणेने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. रहाणे पहिल्या सत्रात लगेचच बाद झाला. पण ऋषभ पंतने त्यानंतर सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. सुरूवातीला त्याने सावध खेळ केला, पण नंतर त्याने सुसाट फलंदाजी केली. अवघ्या तीन धावांनी त्याचे शतक हुकले. १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत पंतने ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. तो नॅथन लायनच्या फिरकीपुढे बाद झाल्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. २०५ चेंडूत त्याने ७७ धावा केल्या.

भारताच्या विजयाच्या आशा ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी यांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे पल्लवित झाल्या होत्या. पण पंत आणि पुजारा बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली. रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त होता. त्यातच भर म्हणून हनुमा विहारीला दुखपात झाली. हनुमा विहारीला धावणेही कठीण झाल्यामुळे सामना वाचवण्याच्या दृष्टीने अश्विन आणि हनुमा विहारीने फलंदाजी केली. अश्विन-विहारी यांनी संयमी फलंदाजी करत अखेर सामना वाचवला. विहारीने नाबाद २३ तर अश्विनने नाबाद ३९ धावांची खेळी केली.