राहूल गांधी नकारवाद सोडा

काल काँग‘ेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्योग पतींसमोर भाषण केले. आता राहुल गांधी यांचा उल्लेख काँग‘ेसचे उपाध्यक्ष असा केला जात असला तरीही राजकीय क्षेत्रात त्यांच्याकडे भावी पंतप‘धान म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या भाषणाकडे लोकांच्या नजराही त्याच अर्थाने लागल्या आहेत. अन्यथा काँग‘ेसचे उपाध्यक्ष अनेक आहेत आणि त्यांची भाषणेही होत नाहीत. राहुल गांधी यांच्या भाषणा विषयी लोकांच्या मनात आतुरता आहे आणि ते भाषण झाल्यानंतर माध्यमांत त्यांवर चर्चा होत, त्याचे विश्‍लेषण होत आहे ते याच अर्थाने होत आहे. आता ते स्वत: पंतप्रधान होण्याबाबत तळ्यात मळ्यात करीत असले तरी तो त्यांच्या सौजन्याचाही भाग आहे आणि डावपेेचाचाही भाग आहे. ते स्वत: 2014 या वर्षाकडे आपल्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पहात नाहीत, आपले पंतप्रधानपद हा विषय गौण आहे अशी त्यांची भूमिका आहे. ते पंतप्रधान होणार आहेत की नाही हा मुद्दा महत्त्चाचा नाही. ज्या संस्थांनी त्यांना भाषणास पाचारण केले होते. त्या संस्थांनी त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाचारण केले होते. या उपरही त्यांचा आपल्या पंतप्रधानपदाला नकार असला तरीही त्यांनी पंतप्रधानांसारखे बोलायला काही हरकत नव्हती.

तसे बोलणे म्हणजे काय ? तर देशाच्या विकासाचा नेमका कोणता आराखडा त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून ते काम करणार आहेत हे नेमकेपणाने लोकांसमारे मांडणे. त्यांच्या वडलांनी तसे केले होते. आजीने आणि पणजोबा म्हणजे पंडित नेहरू यांंनीही तसेच केले होते. नेहरुंनी आपण भारताला आधुनिक बनवू असे म्हटले होते. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावची घोषणा केली होती. राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेण्याची घोषणा केली होती. या प्रत्येकाच्या घोषणांना आणि संकल्पांना नेमक्या योजनांचा आधार होता. नेहरूंनी देशाच्या विविध भागांत वैज्ञानिक प्रयोगशाळांची स्थापना केली होती. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते तर राजीव गांधी यांनी एकविसाव्या शतकात जाण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची कास धरण्याची घोषणा केली होती. राहुल गांधी यांनी तसा काही प‘कार आजपर्यंत तरी केलेला नाही. देशाच्या आगामी शतकाच्या वाटचालीवर परिणाम करू शकेल अशी एखादीही कल्पना त्यांच्या डोळ्यासमोर नाही, तेवढा त्यांचा अभ्यास नाही आणि ती कल्पना समोर मांडण्याचे कसबही त्यांच्याकडे नाही हेच त्यांच्या भाषणातून दिसायला लागले आहे.

सध्या राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोघांचे शब्दयुध्द रंगत चालले आहे. त्यातून एका विशिष्ट वर्गात का होईना पण या दोघांच्याही विशिष्ट प्रतिमा निर्माण होत आहेत. नरेंद्र मोदी हे निरनिराळ्या व्यासपीठावरून बोलताना काही कल्पना मांडून त्या आपण कशा राबवल्या हे सांगत आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी जे काही बोलत आहेत त्याला अनुभवाचा आधार आहे आणि प्रत्यक्ष कृतीची जोड आहे. त्यामुळे त्यांचे भाषण सकारात्मक वाटते. इंडिया टुडे या साप्ताहिकाच्या कार्यक‘मात बोलताना त्यांनी दोन अफलातून कल्पना मांडल्या. शहराचा विकास त्याच शहराचा कचरा आणि वाहून जाणारे पाणी वापरून कसा करावा त्यांनी यावर जालीम उपाय शोधला आहे. त्यांनी गुजरातमध्ये अशा योजना राबविलेल्या आहेत. रेल्वेचे रुळ खाजगी डब्यांना उपलब्ध करून दिले तर रेल्वेला त्याचे भाडे मिळू शकते. हे खाजगी डबे रुळावरून धावल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होते. या डब्यांच्या इंधनात बचत होते. या भाडे म्हणून मिळणारे पैसे रेल्वेला मिळाल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडते त्यातून अनेक नवे मार्ग टाकता येतात. याउलट राहुल गांधी भाषण करतात तेव्हा त्यांचे भाषण पूर्णपणे नकारात्मक असते. एकही विकासाची साधीही कल्पना त्यांच्या भाषणात त्यांनी कधी मांडलेली नाही. कल्पना मांडली तर नाहीच पण स्वतः पुढाकार घेऊन ती कल्पना राबविलेली आहे आणि यशस्वी करून दाखविली आहे असेही त्यांच्या आयुष्यात कधी घडलेले नाही.

ते आजवर काय चुका झाल्या हे सांंगत आहेत आणि आपण सत्ता सामान्य माणसाच्या हातात देणार आहोत असे म्हणत आहेत पण, ती कशी देणार याचा तपशील देत नाहीत. त्यांच्या डोक्यात विकासाच्या कल्पना असतील तर त्या राबवण्यास भरपूर वाव आहे. देशात केंद्रात त्यांचे सरकार आहे. दिल्ली, राजस्थान. महाराष्ट्र, केरळ, आंध‘ प्रदेश, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश अशा विस्तृत प्रदेशावर त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. तेव्हा तिचा वापर करून मोदींचे मॉडेलप्रमाणे राहुल गांधींचे एखादे मॉडेल उभे आहे. असे चुकूनसुध्दा कोठे सापडत नाही. त्यामुळे राहुल गांधीच्या भाषणाला कृतीचा आणि आचरणाचा आधार नाही. किंबहुना तशी कृती करण्याची संधी असताना सुध्दा तिचा वापर करून ते काहीच करून दाखवत नाहीत याचा अर्थ त्यांच्यात कोणतीही कृती करण्याची धमक नाही असा होतो. आजवर बराच काळ त्यांच्याच पक्षाच्या हातात सत्ता होती आणि अजूनही आहे. तेव्हा चुका काय झाल्या हे सांगणे पुरेसे नाही. केवळ मागे वळून पाहण्याने भागणार नाही. पुढे काय करणार याचे नेमकेपणाने दिग्दर्शन हवे आहे.