पुणे, दि. 5 (प्रतिनिधी)-एलबीटीच्या निषेधार्थ सहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच होते. उद्या सारसबाग गणपतीसमोर सकाळी 10 वाजता घंटानाद करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
एल बीटीविरोधात बेमुदत बंद सुरूच
ओस्तवाल म्हणाले की, छोट्या व्यापार्यांना एलबीटीमधून वगळण्याची मागणी केली आहे. या कायद्यातील त्रुटींबाबत चर्चेसाठी 15 मार्चपासून अनेकवेळा मुख्यमंत्री व महापालिका आयुक्त यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. बुधवारी मुख्यमंत्री व गुरुवारी शासनाच्या समितीबरोबर प्रदीर्घ चर्चा झाली. या सर्वांना एलबीटीमधील त्रुटी समजल्या आहेत. त्या त्यांनी मान्यही केल्या आहेत व दुरुस्तीबद्दल आश्वासनही दिले आहे. एलबीटीला स्थगिती देऊन या कायद्याविषयी सविस्तर चर्चा करावी व त्यानंतर दुरुस्ती करून मुंबईबरोबर त्याची अंमलबजावणी करावी. मात्र यातून छोट्या व्यावसायिकांना पूर्णपणे वगळावे अशा व्यापार्यांच्या मागण्या आहेत. त्यावर ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांना स्थगिती देण्याचा अधिकार आहे. ती दिल्यास आम्ही त्वरित बेमुदत बंदचे आंदोलन मागे घेऊ असेही ओस्तवाल यांनी सांगितले.
याप्रसंगी महासंघाचे खजिनदार फत्तेचंद रांका, ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक, महासंघाचे महेंद्र पितळीया, अजित सेटिया, हेमंत शहा व मनोज सारडा उपस्थित होते.
