भारतातील द्वेषमूलक राजकारण धोक्याचे: राहुल गांधी

नवी दिल्ली: एका विशिष्ट समाजाला वेगळं पाडून केलं जाणारं द्वेषाचं राजकारण देशासाठी हानीकारक आहे. देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर भारतीयांनी विकासाचे राजकारण केले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेसच्या
उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल यांनी प्रथमच या परिषदेत आपले विचार
व्यक्त केले.

कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, अर्थात सीआयआयच्या वार्षिक सभेत राहुल गांधी यांनी बड्या उद्योगपतींसमोर भाषण केलं. त्यात विकसनशील भारताची वेगानं होणारी प्रगती आणि काँग्रेसचं व्हिजन, यावर ते भरभरून बोलले. मात्र हे करत असतानाच त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला आव्हान दिल्याचं मानलं जात आहे.

देशाच्या विकासात उद्योगांची महत्वाची भूमिका असल्याचे राहुल यावेळी म्हणाले. भारताची जगाला ओळख करुन देण्याची कौतुकास्पद कामगिरी तुम्ही केली आहे. १९९१ मध्ये जेव्हा मी परदेशी विद्यापीठात गेलो तेव्हा कोणी भारताला ओळखत नव्हते. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. याचे श्रेय तुम्हाला जाते असेही ते म्हणाले.

देशात आज बेरोजगारीचा प्रश्न आहे पण मला त्यापेक्षा सध्या शिक्षणव्यवस्थेत दिले जात असलेल्या शिक्षणाबाबत प्रश्न आहे. आपण आता शिक्षणव्यवस्था बदलण्याची गरज असून व्यावसाभिमुख व कौशल्याधारित शिक्षणव्यवस्था आणण्याची गरज आहे. सरकार एकटे काही करु शकत नाही, असे
सांगत राहुल यांनी देशातील बड्या उद्योगधंद्यातील लोकांनी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मदत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सीआयआयच्या वार्षिक परिषदेत आतापर्यंत वेगवेगळया पक्षांच्या नेत्यांनी देशाच्या आर्थिक विकासासंबंधी आपले विचार मांडले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आतापर्यंत दोनवेळा या परिषदेला संबोधित केले आहे.