द.भारतात सोन्याची अभूतपूर्व टंचाई

कोची दि.४- महाराष्ट्रात पाण्याच्या टंचाईने काही जिल्हे होरपळून निघत असताना दक्षिण भारतातील कांही महत्त्वाची शहरे सोने टंचाईने त्रस्त झाली असल्याचे वृत्त आहे. दक्षिण भारतातील बर्यावच मोठ्या शहरांतून सोन्याचे दागिने घडविण्याचे उद्योग आहेत मात्र आता लग्नसराई तेांडावर आली असताना या केंद्राना सोनेच मिळत नसल्याने हा उद्योगच अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात भारताने सोने आयातीत जगात पहिला क्रमांक नोंदवूनही सोन्याची टंचाई जाणवत आहे.

तमीळनाडूतील कोइमतूर तसेच केरळ मधील कोची आणि थिस्सूर येथे सोने दागिने घडणावळीचे मोठे उद्योग आहेत. भारतातील सोन्याच्या वार्षिक मागणीतील या शहरांचा वाटा १५ ते २० टक्के इतका आहे. ज्या संस्थांकडून या केंद्राना सोने पुरविले जाते त्या संस्था या मागणीला पुर्‍या पडू शकत नाहीत असे सध्याचे दृष्य आहे.

जेम्स अॅन्ड ज्युवेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष विपुल शहा म्हणाले की सरकारने बॅका आणि मोठ्या खासगी संस्थांना थेट सोने आयातीची परवानगी दिली आहे  आणि या संस्था अन्य कंपन्यांनाही हे सोने पुरवू शकणार आहेत. मात्र वरील शहरात दागिने घडणावळीचे छोटे छोटे उद्योग असून त्यांना सोने मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्या संस्था दागिने निर्यात करतात त्यांना सोने मिळण्यात अडचण नाही मात्र छोटे व्यावसायिक सोन्याच्या टंचाईने हैराण झाले आहेत.

सरकारने सोने आयात कमी व्हावी म्हणून आयात करात वाढ केली मात्र त्यामुळे आयात कमी होण्याची अजिबात शक्यता नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. तर वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीप्रमाणे आणि अंदाजाप्रमाणे २०१३ सालात भारतात सोन्याची आयात गतवर्षीपेक्षा अधिक म्हणजे ८६५ ते ९६५ टनांवर जाणार आहे.

मुंबई, दिल्ली, राजकोट, कलकत्ता यासारख्या दागिने घडणावळीचे उद्योग मोठ्या प्रमाणांवर असलेल्या शहरांत मात्र सोन्याची टंचाई नाही असेही समजते.