
पुणे : केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कोणताही प्लॅन नाही, फक्त आदेश काढण्याचे काम सरकार करत असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आज सकाळी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
अर्थव्यवस्था बदलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही प्लॅन नाही : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले की, या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा एक जानेवारी हा दिवस असल्याचे आम्ही मानतो. जी अस्पृश्यता पेशवाईच्या काळात पाळली जात होती, त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही, तोपर्यंत कायम राहील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
अर्थव्यवस्था कशी सुधारायची याचा केंद्र आणि राज्य सरकारकडे प्लॅन नाही. लोक ठरवतात काय करायचे ते. सरकार स्वतः काहीही करत नाही. आतापर्यंत मुंबई लोकल सुरू व्हायला हवी होती. दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नसल्याचेही ते म्हणाले. ते यल्गार परिषदेबाबत बोलताना म्हणाले की, कोळसे पाटलांना यल्गार परिषद घ्यायची असेल तर त्यांनी घ्यावी. मला आणि न्यायमूर्ती पी बी सावंतांना, जी घ्यायची होती ती आम्ही घेतली आणि त्याचा उद्देश देखील साध्य झाल्याचे ते म्हणाले.
