आता तिसरे महायुद्ध

युद्ध म्हटले की, संहार, नुकसान मानवी आणि वित्त हानी. अगोदर झालेल्या दोन महायुद्धामध्ये जगातील अनेक देश तावून सुलाखून निघाले आहेत. पहिले महायुद्ध हे इ.स. 1914 ते इ.स. 1918 दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युनायटेड किंग्डम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने) व केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रिया-हंगेरी, प्रशिया (वर्तमान जर्मनी), बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

तर दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्यामध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धात पदार्पण केले. डिसेंबर 1941 मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये फ्रान्स, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ 70 देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली होती. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी मानली जाते. या युद्धामध्येही दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता.

इतके सर्व झाल्यानंतरही आता पुन्हा तिसर्‍या महायुद्धाचे संकेत काही देशांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने उत्तर कोरिया विरूद्ध दक्षिण कोरिया असे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र या दोन देशांना मदत करणारे अनेक देशही सरसावले आहे.

कोरिया द्वीपकल्पात तणावात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया आमने-सामने उभे ठाकले असून, आता त्यात अमेरिका आणि चीन यांनी लक्ष्य घातल्याने तिस-या महायुद्धाची सुरुवात मानावी का असा प्रश्न पडू लागला आहे.

अमेरिका दक्षिण कोरियाच्या बाजूने मैदानात उतरली आहे, तर तिकडे चीनने आपल्या लष्कराला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उत्तर कोरियाची अमेरिकेसह दक्षिण कोरियाच्या विरोधात प्रक्षोभक व भडक वक्तव्ये सुरुच असल्याने अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या समुद्रात आपली लढाऊ जहाजे (बॅलेस्टिक मिसाईल) उतरविण्यास सुरुवात केली आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग उन यांनी म्हटले आहे की, आजच्या काळात प्रत्येक देशाला शांततेसाठी अण्वस्त्रांची गरज आहे. पुढे त्यांनी अमेरिकेला ठोकताना म्हटले की, आपल्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी यांना अण्वस्त्रांची गरज पडते मात्र आम्हाला शांततेसाठी व विकासासाठीही अण्वस्त्र वापरण्यास बंदी व अटी घातल्या जातात. आम्ही यापुढे असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. उत्तर कोरिया अण्वस्त्रसज्ज असल्याचे सांगताना त्यांनी केसीएनए या वृत्तसंस्थेला सांगितले की, आपण हे गृहित धरुन चालायला हवे की अण्वस्त्रे ही हमखास यशाचे शस्त्र आहे. तेच आपले स्वातंत्र्य, सार्वभौम व अस्तित्त्व टिकवतील.

दरम्यान, अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या समुद्री किना-यावर बॅलेस्टिक मिसाइल उभे केले आहेत. तसेच रडार प्लॅटफॉर्मच्याद्वारे शस्त्रू देशांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे. अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियाला कसे रोखायचे याचे नियोजन सध्या अमेरिका करीत आहे. माध्यमात येत असलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेने उत्तर कोरियाशी लढण्याची जय्यत तयारी केली आहे. अमेरिका सेनेने हिशोब असा मांडला आहे की, उत्तर कोरियाला निपटून काढण्यासाठी 90 हजार सैनिक लागतील तसेच त्यासाठी 56 दिवसाचा कालावधी लागेल.

संरक्षण न्यूज वेबसाईटच्या माहितीनुसार, अमेरिकी सेनेतील रणनितीकारांनी अण्वस्त्र, रासायनिक हत्या-यांनी सज्ज आणि समाजासाठी धोकादायक ठरणा-या प्रवृत्तींशी जोडल्या गेलेल्या सर्वांना नष्ट करण्याचा प्लान केला आहे. मात्र याचे मॉडेल कसे असेल याबाबत संशय व्यक्त केला आहे. यात उत्तर कोरिया पहिले लक्ष्य असेल. अमेरिका लष्कर मित्र देशांच्या जमिनीचा वापर करीत कोणतेही गंभीर समस्या निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्नशील असणार आहे. 56 दिवसासाठी अमेरिका लष्कर दोन विभागात विभागली जाईल. त्यातील पहिले काम त्यांचे अण्वस्त्रे नष्ट करणे हे असणार आहे.

युद्धासारखी स्थिती तयार झाली तर, दक्षिण कोरिया लागलीच उत्तर देण्यास तयार राहणार आहे. दरमम्यान, अमेरिकेने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, उत्तर कोरियाच्या सैनिकांना आम्ही सशस्त्र पाहिले नाही. उत्तर कोरियाने अणुचाचणी केल्यानंतर आम्ही व उर्वरित जगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर कोरियावर घातलेल्या कडक आर्थिक निबंर्धांमुळे हा देश उकसला आहे. जर उत्तर कोरिया दक्षिण कोरियावर काही शस्त्रास्त्र कारवाई करेल तर त्याला ताबडतोब उत्तर देण्यात येईल. तसेच या लढाईत पुन्हा चर्चेची दारे बंद होतील.

भारताचा दक्षिण कोरियाला पाठिंबा आहे. मात्र तो दोन देशादरम्यान असलेल्या व्यावसायिक व वाणिज्यविषयक करारामुळे. 2015 पर्यंत या दोन देशात संरक्षण, व्यापार, इलेक्ट्रानिक आणि विज्ञान क्षेत्रात 2.17 लाख कोटींच्या व्यापार होणार आहे. त्यामुळे सद्य स्थितीत भारत दक्षिण कोरियाबरोबर राहील. मात्र जर येथील प्रकरणाला वेगळेच वळण लागले तर, भारत अमेरिकेच्या विरोधात जात भविष्यातील गरज म्हणून रशिया, चीन, जपानला जवळ करु शकतो.
चीनला उत्तर कोरियाची सीमा आहे. त्यामुळे चीनने आपल्या सीमेवर सतर्कतेचे आदेश दिले आहेत. चीनचा उत्तर कोरियाला पाठिंबा आहे. तसेच अमेरिकेला शह देण्यासाठीही चीन प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग असल्याचे दिसते. तसेच संपूर्ण जगाची पुन्हा एकदा दोन गटात विभागणी होऊ शकते. यावेळी मात्र अमेरिका-युरोपला या जुन्या व परंपरागत मित्रांना रशिया-चीन-भारत-जपान यासारखा दूसरा गट जबरदस्त प्रत्युत्तर देऊ शकतो. तसेच अमेरिकेची मस्ती उतरविण्याचा ताकद आता या देशात नक्कीच आली आहे.
या नकाशाद्वारे समजून घ्या उत्तर आणि दक्षिण कोरियाची भौगोलिक माहिती. उत्तर कोरियाला चीनची लांबच-लांब सीमा आहे. ही सीमा उत्तर-पश्चिम दिशेला आहे. उत्तर कोरियाच्या उत्तरेला रशिया आहे. तर, दक्षिणेला जपान आहे. हे सर्व देश उत्तर कोरियाच्या बाजूने आहेत. त्यामुळे दक्षिण कोरिया व पर्यायाने अमेरिका कोरिया द्वीपकल्पात एकटीच सापडणार आहे.
कोणता देश कोणासोबत ?
उत्तर कोरिया- चीन, रशिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, पाकिस्तान, जपान. रशिया आणि जपान प्रत्यक्षपणे सोबत नाहीत, परंतु संरक्षण, वाणिज्य प्रकरणात हस्तक्षेप करू शकतात.
दक्षिण कोरिया- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अर्जेंटिना, न्यूझीलंड, युरोपियन संघटना. भारताने कोरियातील युद्धाच्या काळात अमेरिकी सैनिकांच्या मदतीला मेडिकल स्टाफ पाठवला होता.