सौर उर्जेचा नवा फंडा

अहमदाबाद दि.२ – देशाला जाणवत असलेली वीजेची टंचाई दूर होईलच पण अणुउर्जेमुळे तसेच औष्णिक उर्जेमुळे होणारे प्रदूषण होणार नाही. शिवाय रस्ते देखभालीचा खर्च कमी आणि वाहन देखभालीचाही खर्च कमी. स्थानिक रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि रेन वॉटर हार्वेस्टीगही करता येईल असा बहुगुणी,एकदाच गुंतवणूक करावा लागणारा पर्याय अहमदाबाद येथील गुजराथ एनर्जी रिसर्च व मॅनेजमेंट इन्सिट्यूटमधील संशोधकांनी सुचविला असून त्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. हा प्रस्ताव आहे भारतातील महत्त्वाच्या हायवे आणि स्टेट वे वर सोलर पॅनल बसवून सौर उर्जा मिळविण्याचा. या संबंधीचा पेपरही नुकताच इंटरनॅशनल जर्नल ऑफ एनर्जी, एनव्हिरॉनमेंट अॅन्ड इंजिनरींग मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

वरील संस्थेचे संचालक आणि या प्रयोगातील एक संशोधक तिरूमलाचेट्टी हरिनारायण या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की आज सौर उर्जा पॅनल उभारणीसाठी लागणारी जमीन आणि तिची उपलब्धता या मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे सौर उर्जा निर्मितीसाठी हायवेंचा वापर करण्याची ही कल्पना आहे. देशातील महत्त्वाच्या हायवेवर लांबीनुसार सोलर पॅनलचे छत उभारता येणार आहे. या  फोटोव्होल्टीक पॅनलमध्ये सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकणार आहे. या पॅनल्सची किंमतही सध्या कमी होत चालली आहे शिवाय त्यासाठी वेगळी जमीन लागणार नाही म्हणजे जमिनीसाठी करावा लागणारा खर्च करावा लागणार नाही.

या प्रकल्पाच्यासाठी गुजराथमधील दोन हायवेचा अभ्यास करण्यात आला असून कांही निरीक्षणे नोंदविली गेली आहेत. २०५ किमीच्या चार पदरी हायवेवर पॅनल टाकली तर त्यातून १०४ मेगावॉटवीज निर्मिती होऊ शकते असे दिसून आले आहे. देशात ५२,५८४ किमी लांबीचे  चार पदरी हायवे आहेत.अगदी सुवर्ण चतुष्कोन या दिल्ली मुंबई, चेन्नई कोलकत्ता हायवेचा विचार केला तरी त्यावर सौर पॅनल बसविली तर ४४१८ मेगावॉट वीज निर्मिती होऊ शकणार आहे आणि ७३०० किमीच्या श्रीनगर, कन्याकुमारी, पोरबंदर, सिल्चर हायवेवर तब्बल ५५२४ मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकणार आहे. रस्त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला तर रेल्वे मार्गांचाही विचार केला जाऊ शकतो असे हरिनारायण यांचे म्हणणे आहे.

याचे अन्य फायदेही आहेतच. यातून कुशल अकुशल कामगारांसाठी रोजगार निर्मिती होईल. रस्त्यावर सावली राहिल्याने वाहनांची क्षमता वाढेल, टायरचे लाईफ वाढेल, रस्ते देखभालीचा खर्च कमी होईल आणि कांही ठराविक जागी रेन वॉटर हार्वेस्टींग करून भूजलाची पातळीही वाढविणे शक्य होणार आहे. शिवाय ही गुंतवणूक एकदाच करावी लागणार आहे असेही हरिनारायण यांनी सांगितले.