नवी दिल्ली: क्रीडा मंत्रालयाचे आदेश आपल्यावर बंधनकारक नाहीत; असे सांगत राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक संस्थेने (नाडा) ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता मुष्टीयोद्धा विजेंद्र सिंह याची चाचणी करण्यास नकार दिला आहे. नाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना हा दावा केला.
अमलीपदार्थ सेवन प्रकरणी पंजाब पोलिसांनी आरोप केल्याने अडचणीत आलेल्या विजेंद्र सिंह याची चाचणी करण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने नाडाला सोमवारी दिले होते. मात्र नाडा ही स्वतंत्र संस्था असून विजेंद्र सिंहची डोपिंग चाचणी करण्याचा विचार होऊ शकतो. मात्र मंत्रालयाचे आदेश आमच्यावर बंधनकारक नाहीत; असा पवित्रा नाडाने घेतला आहे.
विजेंद्र सिंगने आतापर्यंत १२ वेळा तर त्याचा सहकारी राम सिंग याने ५ वेळा मादक पदार्थांचे सेवन केले असून केनडा स्थित अनिवासी भारतीय अमलीपदार्थ तस्कर अनुप सिंह कहालो याच्याकडून विजेंद्र सिंग याने अमली पदार्थ मिळविले असा पंजाब पोलिसांचा दावा आहे. कोहालो याला पोलिसांनी ३ मार्च रोजी अटक करून त्याच्याकडून २६ किलो हेरोईन हस्तगत केले आहे.