दुष्काळग्रस्तना दिली ‘सिद्धिविनायक’ने २५ कोटीची मदत

मुंबई – गेल्या काही दिवसापासून राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तच्या मदतीसाठी काही सामाजिक संस्था पुढे येत आहेत. येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ कोटी रुपयांचा मदत देण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे न्यासाच्या विश्वस्तांनी हा धनादेश दिला.

सध्या मराठवाड्यातील जनतेला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. आणखीन दोन महिने परिस्थिती तशीच राहणार आहे.गेल्या काही दिवसापासून अगदी थेंब-थेंब पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागत आहे. गायी-म्हशींना चारा कुठून द्यायचा, असा प्रश्न बळीराजापुढे आहे. त्यामुळे सध्या शेतक-यांना मोठ्या मदतिची आशा आहे.

दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था या कार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. देशभरातील असंख्य गरजूंना सढळहस्ते मदत करणा-या सिद्धिविनायक मंदिर न्यासानंही या कामी पुढाकार घेतलाय. त्यांनी २५ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शिंदे , अध्यक्ष सुभाष मयेकर तसेच एकनाथ संगम , नितिन कदम , सतिश पाडावे , प्रवीण नाईक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ही मदत त्वरित दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे समजते.