मराठी माणूस महाराष्ट्राचा नाही – काटजू

मुंबई, दि.1- आपल्या विधानांमुळे सतत चर्चेत राहणारे प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंन्डेय काटजू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भूमिपुत्रांचा मुद्दा हा राष्ट्रविरोधी आहे, देशाच्या एकात्मतेला यामुळे धोका असल्याचे काटजू म्हणाले.

देशामध्ये प्रत्येक नागरिकाला कुठेही राहण्याचा, व्यापार करण्याचा अधिकार आहे. उत्तर प्रदेशमधील नागरिकांना महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी माणसा इतकाच अधिकार आहे. मराठी माणसालाही इतर राज्यांत राहण्याचा अधिकार आहे. पण अगोदर दक्षिण भारतातील लोकांना हकलवून लावले, आता बिहारी लोकांना बाहेर काढले जात आहे. हे काही लोक जे करत आहे ते अत्यंत देशविरोधी कृत्य आहे. यामुळे देशाचे तुकडे होतील, देश कसा चालले? अशी टीका काटजू यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. ते भिवंडीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात मराठी माणसेही परप्रांतीयच आहेत. तेथील भिल्ल तेवढे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे हाकलायची वेळ आल्यास मराठी माणसांनाही महाराष्ट्रातून हाकलून द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

तसेच पाकिस्तान हा देश सध्या पागलखाना झाला आहे. दररोज बाँबस्फोट होत असल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

काटजू यांनी नसत्या भानगडीत पडू नये, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावे. काटजू हे माजी न्यायमूर्ती आहे, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, परंतु, त्यांनी भूमीपुत्रांबाबत जे वक्तव्य केले आहे, ते एखाद्या मेंटल माणसासारखे केले आहे. त्यामुळे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात यावे.