‘संशय का मनी आला’; खरं तर या पश्नाला उत्तर नाही. खोकला कसा येतो? तसा संशय येतो! आशा, जयसिंह, श्रावणी आणि धनुच्या आयुष्यातसुध्दा डोळयातल्या पाऊलवाटेने प्रेम शिरतं; तसंच मनाच्या चोरटया वाटेने संशय शिरतो आणि मग जो कल्लोळ होतो त्याचा जवाब नाही! संशयाच्या कॉकटेलमधून जन्माला येतो तो नात्यांचा एक गडबडगुंडा.
जयसिंह एक यशस्वी फोटोग्राफर आहे आणि जयसिंहच्या स्टुडिओच्या आवारातच आशाचं कपडयाचं बुटीक आहे. जयसिंह आणि आशाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. या प्रेमातून आलेली एक अधिकारवृत्तीही आहे आणि या अधिकारवृत्तीतून आलेला संशयही आहे. याच शहरात राहणा-या धनु नावाच्या एका व्यावसायिकाचा जीव श्रावणी नावाच्या एका टीव्ही सिरियलच्या अभिनेत्रीवर जडलाय. प्रेम व्यक्त झाल्यावर मात्र संशयाचं भूत धनुच्याही मानगुटीवर बसतं. प्रेमाच्या पाऊलवाटा आणि संशयाच्या चोरवाटा इतक्या एकमेकांमध्ये मिसळतात की या चौघांच्याही नकळत ते एकमेकांच्या वाटेत गुरफटले जातात.
श्रावणी जयसिंहकडे एका फोटोसेशन करता आलेली असता; तिला चक्कर येते आणि धनुने प्रेमाचं प्रतिक म्हणून तिला दिलेलं लॉकेट हे जयसिंहच्या स्टुडिओत पडतं. धनुचा फोटो असलेलं लॉकेट नेमकं आशाच्या हाती लागतं आणि संशय तिच्या मनाचा ठाव घेतो. जयसिंहला ते लॉकेट आशाच्या ताब्यात सापडतं. इकडे लॉकेट गायब झालं आहे हे धनुच्या लक्षात येतं.
यापुढच्या प्रसंगांमधून हा संशय बळावतंच जातो आणि या चौघांसकट त्यांच्या आजुबाजूचे लोकही या नात्यांच्या गडबडगुंडयामध्ये खेचले जातात. प्रत्येक जण हा गुंता सोडवायला जातो पण प्रत्यक्षात तो वाढवूनच ठेवतो आणि पडद्यावरच्या संशयकल्लोळाचं रुपांतर पेक्षकांच्या हास्यकल्लोळात होतं!