बीपीओची झळाळी कमी होतेय

पुणे,दि.1 वीस वर्षापूर्वी नवी अर्थ व्यवस्था आल्यापासून भारतात तयार असलेल्या माहितीतंत्रज्ञानातील इंजिनिअर्सनी नेटाने काम करून ते पेलले माहिती तंत्रसज्ञानाने समृद्धीचे युग आणले. फार मोठी गुंतवणूक न करता हे क्षेत्र वाढले. त्याला फारशा पायाभूत सोयीही लागत नाहीत. या उद्योगाने फारसे प्रदूषणही होत नाही. त्यामुळे देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा मोठा राहिला. या वाढीला काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. पहिली म्हणजे तांत्रिक सोयी, दुसरी इंग्रजी बोलणार्‍या मुलांची उपलब्धता आणि तिसरी गोष्ट स्वस्त मनुष्यबळ. आता असे लक्षात यायला लागले आहे की, हळुहळू जगातल्या इतरही देशांनी इंग्रजी शिकायला सुरूवात केली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताशी बरोबरी केली आहे. त्यामुळे भारतातला बीपीओचा धंदा अनेक देशांकडे वळला आहे.

स्वस्त मनुष्यबळ हे आपले वैशिष्ट्य होते पण आता देशाचे आर्थिक मान वाढले असल्याने मनुष्यबळ स्वस्त राहिलेेले नाही. भारतापेक्षा अन्य काही देशातले मनुष्यबळ आता स्वस्त झाले आहे. परिणामी फिलिपाइन्स, ब्राझील, कॅनडा, झेकोस्लोव्हाकिया, चीन, उक्रेन, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, पोलंड, मलेशिया या देशात कॉल सेंटर्स आणि बीपीओ कंपन्यांची भरभराट होत आहे.

एकट्या फिलिपाइन्सने गेल्या पाच वर्षात भारतात बीपीओ कंपन्यांत निर्माण होऊ पाहणार्‍या नव्या नोकर्‍यांपैकी2 लाख नोकर्‍या खेचून घेतल्या आहेत. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक देशाने भारतात तयार होणार्‍या किमान 30 हजार ते एक लाख इतक्या नोकर्‍या आपल्याकडे ओढल्या आहेत.

भारतात या व्यवसायात आता रोजगार निर्मितीही कमी झाली आहे आणि या देशांची स्पर्धा वाढल्याने ज्या नोकर्‍या निर्माण होत आहेत त्यांना पूर्वीएवढा पगारही मिळत नाही. एका अंदाजानुसार भारतातल्या आठ लाख नोकर्‍या गेल्या आहेत. आता भारतीय बीपीओ कंपन्यांपुढे असा प्रश्‍न पडला आहे की उतरणीवर काय उपाय योजावा ? त्यांनी काही उपाय योजिलेही आहेत.

पहिला मार्ग म्हणजे भारतीयांचे रोजगार ओढून घेणार्‍या या देशांतच आपली दुकाने टाकणे.भारतातल्या काही कंपन्यांनी फिलिपाइन्स आणि मलेशिया या देशात आपली कार्यालये सुरूही केली आहेत. दुसरा उपाय म्हणजे वेतन कमी करणे. मोठ्या शहरात कार्यालये असली की मोठे पगार द्यावे लागतात. म्हणून पुण्याच्या ऐवजी कोल्हापूर आणि अहमदाबादच्या ऐवजी वडोदरा असे स्थलांतर करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. टायर वन शहरांऐवजी टायर टू किंवा टायर थ्री शहरांत गेल्यास तिथे आणखी कमी पगारात माणसे मिळतील असा त्यांचा कयास आहे.

Leave a Comment