दुष्काळाचे अतीव दुर्दैव पर्वˆ सुरू : वेश्या संख्येत वाढ

सोलापूर, दि.31: दुष्काळ पडला की शेेतकरी कुटुंबांची वाताहत होते. अनेक शेतकरी आणि ग्रामीण भागातले शेतमजूर मोठया शहरात जातात. तिथे रहायला जागा नसते. पाण्याची सोय नसते पण हाताला काम मिळून पोटाची सोय होते म्हणून राहण्याच्या जागेच्या गैरसोयी सहन करून ते शहरात गर्दी करतात. या स्थलांतराला आता गती आली आहे आणि त्याचा एक वेगळाच कोन समोर आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक शेतकर्‍यांच्या मुली मुंबई सारख्या मोठ्या शहरात वेश्या व्यवसाय करायला येत आहेेत.

गावाकडे होणारी उपासमार टाळायची असेल तर शरीरविक्रय करण्याशिवाय पर्याय नाही अशा निष्कर्षाप्रत या मुली आल्या आहेत. त्यांना हाल अपेष्टांतून बाहेर काढणारे हे साधन त्यांची सोय तर लावतेच पण त्यांना मिळालेल्या पैशातला काही पैसा त्या गावाकडेही पाठवतात आणि आपल्या कुटुंबाचा आधारही होतात. मुंबईत पूर्वी वेश्या व्यवसायात नव्या मुली येत असत तेव्हा त्यातल्या 70 टक्के मुली नेपाळमधील असत. नंतरच्या काळात अजून काही मुली येत गेल्या. त्यातल्या 50 टक्क्यांहूनही अधिक मुली बंगालमधील होत्या पण आता या व्यवसायात उतरणार्‍या 70 टक्के मुली मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या आहेत.

गेली पाच वर्षे उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही गावांतून दररोज एखादी तरी गरीब मुलगी वेश्या व्यवसायासाठी पळवली जायची. या अपहरणात अनेक प्रकार होते. त्यातल्या काही मुलींना शहरात मोठ्या घरात कामाला लावण्याचे आमिष दाखवले जायचे. काही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन वेश्यागृहांना विकले जायचे. काही मुली चैनी जीवन जगण्याच्या आशेने स्वत:हून या व्यवसायात येत असत. हे कळल्यावर या भागातल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बहीण वाचवा मोहीम सुरू केली होेती.

मुली पळवल्या जाऊ नयेत यासाठी त्यांचा प्रयत्न असे. त्या मुली गरीब घरातल्या, दलित समाजातल्या असत पण आता शेतकरी कुटुंबातल्या आणि समाजातल्या सवर्ण जातीतल्या मुलीही केवळ नाईलाज म्हणून जाणून बुजून या व्यवसायात येत आहेत. अर्थात त्यांचा ओढा मुंबईकडेच आहे. यातल्या काही मुलींच्या आई वडलांना आपली मुलगी काय करीत आहे हे माहीत आहे पण काही माता पित्यांना ते समजले आहे आणि त्यांनी उरावर धोंडा ठेवून वस्तुस्थिती स्वीकारली आहे. मुंबईत शरीर विक्रय करणार्‍या मुलींशी बोलायला लागतो तेव्हा अशा किती तरी अश्रुभरल्या कहाण्या बोलक्या होतात.