माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज काही तरी नवे घडताना दिसत असते. या आठवड्यात देशातील चाळीसहून अधिक शहरातील टीव्ही हे अॅनॅलॉग पद्धतीवरून डिजिटल पद्धतीवर जाणार आहेत. त्याच्या जाहिराती गेल्या तीन महिन्यापासून सुरु आहेत. देशातील पहिल्या आघाडीतील सहा शहरात तो प्रकार सहा महिन्यापूर्वीच झाला आहे. पुढील आठवड्यापासून पुण्यासह पिंपरी चिंचवड, ठाणे,नागपूर अशा महाराष्ट्रातील आठ शहरांत केबलमधून दिसणार्या टीव्हीवाहिन्या बंद होणार असून तेथे काही कंपन्यांचा सेट टॉप बॉक्स बसवावा लागेल अशा जाहिराती सुुरु झाल्या आहेत. त्यामुळे अतिशय स्पष्ट आणि अधिक प्रभावी अशा पद्धतीने सेवा मिळणार आहे. केबलवाल्याखेरीज डिश अँटेना अशा स्वरुपाचा हा फरक वाटला तरी पंचवीस वर्षापूर्वी सुरु झालेल्या या संगणक युगातील हा महत्वाचा टप्पा पुढे सरकत आहे. एका छोट्या मोबाईलच्या डबीत शेकडो पद्धतीच्या तंत्रज्ञानाने युक्त अशी यंत्रणा बसविलेली असते तो एक चमत्कार असूनही नियमित वापराने आपल्याला त्याचे आश्चर्य वाटेनासे झाले आहे. ही सुविधा आता हा जगभर लोकजीवनाचा भाग झाली आहे. त्या खेरीजचे जीवन हळूहळू अशक्यच होत आहे. आपण ज्या व्यक्तीशी मोबाईल किंवा फोनवर बोलतो ती व्यक्ती ती व्यक्ती हजारो किमी दूर असली तर ती समोरच बसली आहे असे दिसणे हा लवकरच सुरु होणारा पुढचा टप्पा आहे. सध्या स्काईपवर लोक अन्य ठिकाणच्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघतच संवाद करत असतात. त्या चित्राचे थ्री डी लवकरच सार्वत्रिक होणार आहे. एक विशेष गॉगल घालून संवाद सुरु झाला की आपण तिकडच्या घरी आणि ती व्यक्ती इकडच्या घरी असा अनुभव घेता येेणार आहे.
डिशटीव्ही : तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाचा आरंभ
मोबाईल व इंटरनेटप्रमाणे अजून अनेक चमत्कारांचा परिचय आपल्याला लवकरच होणार आहे. स्टेमसेल, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी ही त्यापेक्षाही प्रचंड परिणाम घडविणारी क्षेत्रे अजून झाकली मूठ आहेत. या प्रचंड सुविधामधून किंवा त्याच्या ट्रॅफिक जॅममधून माणूसच सापडेनासा होईल अशी भीती वाटू लागली आहे. संगणकाचा उपयोग एका बाजूला तर त्यातून निर्माण होणार्या समस्या दुसर्या बाजूला अशी स्थितीत सारा युरोप हादरला आहे. त्याविरोधात तेथे कायदे करण्याची तयारी सुरु झाली आहे. जीवनमूल्यांसाठी स्वतंत्र मोहीम सुरु करण्यासाठी नियोजन सुरु झाले आहे.एका बाजूला तिकडेही त्याचा वापर वाढतो आहेच. आपल्याकडेही त्यातून स्वैराचार फैलावतो काय असे वाटू लागले आहे. पण युरोप अमेरिकेप्रमाणे त्यावर जाहीर चर्चा होत नाही. त्यामुळे समस्या समजत नाहीत. टीव्हीसंचावरील कार्यक्रमावरच चर्चा होत असते. तरीही त्यावर किती वाहिन्या दिसतात त्याला फार अर्थ राहिलेला नाही. पंचवीस वर्षापूर्वी फक्त दूरदर्शन दिसत असे. नंतर प्रत्येक वर्षी मोठे अंतर कापले जावू लागले. वाहिन्यात प्रथम स्टार टीव्हीने क्रमांक लावला. दूरदर्शनखेरीज फक्त स्टारवर बीबीसीचे बुलेटिन दिसायचे. बाबरी पतनाच्या वेळी बीबीसीने दाखवलेले ते दृश्य हा चमत्कार वाटला होता. सामान्य माणसाच्या दृष्टीने तेथूनच माहिती तंत्रज्ञानाचा प्रवास सुुरु झाला. विज्ञानाच्या त्या चमत्कारातून हळूहळू दैनंदिनी जीवनाच्या उपयोगाचे माहितीतंत्रज्ञानाचे युग सुरु झाले. एकाच वेळी बरेच चॅनेल्स दिसू लागले आणि अगदी स्थानिक विषयही त्यावर दिसू लागले हा फायदा. पण हा व्यवसाय अचानक व मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्याने दोन व्यावसायिकांतील व्यावसायिक मर्यादा निश्चित होण्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यातून केबल वॉर नावाचा एक गुन्हेगारीशी संबंध असलेला प्रकार सुरु झाला.
पत्रकारितेच्या दृष्टीने केबलमुळे नवा अध्याय सुरु झाला. आज इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे आणि मोठमोठ्या दैनिकांच्या आवृत्या यांच्या प्रभाव झोतात त्याचे महत्व लक्षात येणार नाही पण वीस वर्षापूर्वी जेंव्हा फक्त दूरदर्शनच्याच बातम्या असत तेंव्हा या केबलच्या बातम्यांनीच ती कोंडी फोडली याला फार महत्व आहे. त्यावेळी भारतीय पत्रकारितेची कोंडी तेंव्हा या केबल न्यूजने मोडली. आजच्या प्रचंड खर्चाच्या वाहिन्यांच्या खर्चामुळे याचे महत्वही लक्षात येणे कठीण आहे. भारतातील पहिल्या स्थानिक केबल न्यूज आरंभ करण्यात मला भूमिका घेता आली याचे आजही मनाला एक समाधान आहे. टाईम्स ऑफ इंडियातील त्यावेळचे एक विशेष प्रतिनिधी श्री आनंद आगाशे आणि महाराष्ट्र डिशअँटेना ओनर्स संघटनेचे अध्यक्ष वसंत पटवर्धन यानी एकत्र बसून केबल न्यूज नेटवर्कची योजना तयार केली. त्या काळी लग्नमुंजीच्या शुटिंगसाठी वापरले जाणारे व्हीएचएस कॅमेरे वापरून न्यूज बुलेटिन तयार केले जायचे. ते प्रस्थापित व्हायला वेळ लागला पण भारतातील पहिले खाजगी न्यूज बुलेटिन पुण्यात झाले. त्यात वसंत पटवर्धन यांचा सिंहाचा वाटा तर होताच पण आर्थिक गुंतवणूकही होती. ते तसे एक केबल व्यावसायिक होते पण तीन कॅमेरे, तीन कॅमेरामन, तीन बातमीदार एक व्हीडीओ एडिटर, एक बुलेटिन रीडर वगैरे माणसे गोळा करणे हे काही सोपे नव्हते. प्रत्येकाचे स्वत:चे उद्योग करून हे काम होत असल्याने तुलनेने कमी किंमतीत हे बुलेटीन तयार व्हायचे. हा सारा प्रयत्न सुपर कॉम्प्यटरचे निर्माते डॉ विजय भटकर यांना समजला तेंव्हा ते बघायला तर आलेच पण त्यांनी त्या प्रयोगालाच प्रयोगशाळेचे रूप दिले. त्या काळी तेही केबलमधून सार्या वाहिन्या, सारी रेडिओ स्टेशने, इंटरनेट, ई बँकिंग, येवढेच नव्हे तर ई अॅग्रीकल्चर आदि सुविधा बसविण्याच्या प्रयत्नात होते. सीडॅकमधील एक यशस्वी संशोधक श्री पी आर एकनाथ यांची त्यांनी त्यासाठी नियुक्ती केली होती. त्यातून अनेक संशोधनाला गती आली.
आज आपण मोठ्या प्रमाणावर निसर्गाने दिलेली बिनतारी संदेश वापरत आहोत. त्याचा वापर येवढ्या मोठ्या प्रमाणावर होत आहे की, घरातील दारे उघडायलाही रिमोट कंट्रोल लागत आहे. पण या बिनतारी संदेशाला मर्यादा आहे. जेंव्हा सध्या लागत असलेल्या एकूण सुविधापैकी इंटरनेट, सार्या वाहिन्या, सारी रेडिओ स्टेशने, ई बँकिंग, ई बिझीनेस, ई इंडस्ट्री, ई अॅग्रीकल्चर, ई एज्युकेशन हे सारे बिनतारीतून परडणार नाही व ते सारे घरात येणार्या एका टेलिफोनच्या अगदी केसापेक्षाही सूक्ष्म तारेतून मिळवता येते हे लक्षात येणार आहे तेंव्हा डॉ भटकर आणि पी आर एकनाथ यांनी करून ठेवलेल्या संशोधनाला चांगले दिवस येणार आहेत. त्यानी तर अजून बरीच संशोधने करून ठेवली आहेत. ती म्हणजे संगणक किंवा टीव्ही संच हा आज हे आज मॉनिटरपद्धतीचे आहेत. त्याऐवजी अगदी दिवसाही भिंतीवर प्रकाशझोत पाडून कीबोर्डच्या आधारे सारी कामे करता येणार आहेत.
विज्ञानाचे हे शोध यंत्रांच्या संदर्भात काही चमत्कार घडवितात यापेक्षा सामान्य जीवनात त्याची भूमिका काय असते याला महत्व येणे आवश्यक आहे. आज महाराष्ट्रात पाच कोटी मोबाईल व एक कोटी मोटारसायकली आहेत. त्यांचा उपयोग शेतीसाठी झाला तर प्रगतीचे फार मोठे अंतर कापले जाणार आहे पण त्यासाठी खेड्यातील सामान्य तरुण कामाला लागला पाहिजे. मोटारसायलचा उल्लेख अशासाठी की, आज फक्त वाहन म्हणून मोटारसायकलचा उपयोग होतो आहे. त्याऐवजी वेळप्रसंगी ‘छोटा ट्रॅक्टर’ असा उपयोग होणे आवश्यक आहे. किमान जुन्या गाड्यावर हा प्रयोग होणे आवश्यक आहे. सामान्य माणसाच्या हातात एक मोबाईल मिळाल्यावर त्यातील संगणकीय यंत्रणा व्यक्तिगत वैद्यकीय तपासण्या व शेतीच्या तपासण्यासाठीही सहजपणे उपयोगी पडू शकते. अमानुष महागाईच्या काळात विज्ञानाने या पद्धतीने सामान्य माणसाला हात दिला तर त्याची गरज आहे. त्या दृष्टीने तरुण अभ्यासकांचा एक गट कामही करत आहे. पण गरज काही लाख हातांची आहे.
-मोरेश्वर जोशी, पुणे
