तेजस्वी यादव यांचा गौप्यस्फोट, पुढच्या वर्षीही बिहारमध्ये होऊ शकतात निवडणुका


पाटना – नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार बिहारमध्ये येऊन महिना देखील उलटलेला नाही. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणूक निकालाची तेजस्वी यादव यांनी आढावा बैठक घेतली. त्यांनी यावेळी बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात, त्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

तेजस्वी यादव यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात बैठक बोलावली होती. त्यांनी या बैठकीत बोलताना नेते व पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले. राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यांनी मला पूर्ण अधिकार दिले आहेत. तुम्हाला हे विसरून चालणार नाही आणि सक्रिय राहा. पूर्ण तयारीनिशी सगळ्यांनी राहावे, पुढील वर्षी पुन्हा निवडणूक होऊ शकते. सध्याच्या सरकारवर लोक नाराज असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले.

पक्षात मोठे फेरबदल करण्याचेही संकेत यावेळी तेजस्वी यादव यांनी दिले. सर्वच समूहातील लोकांना पक्ष संधी देईल. जुन्या परंपरेत आता बदल करण्याची गरज असून हे बदल आढावा घेऊन केले जातील. पक्षातूनच झालेल्या बंडामुळे आपले अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत. असे करून कुणालाही फायदा होत नाही. ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना पक्ष दुसरीकडे संधी देईल, पण पक्षात राहून पक्षविरोधी काम करणे चांगले नसल्याचे तेजस्वी यादव म्हणाले. नेत्यांच्या पराभवाची कारणमीमांसा या बैठकीत करण्यात आली. यात वेगवेगळ्या कारणांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीविषयी भाष्य करणे टाळले.