मनसे असेच राज्य करणार का ?

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र माझ्या हातात सोपवा तर खरा, बघा कसा सर्वांना सरळ करतो ते, असे म्हणत असत. त्यांची सत्ता हाती घेण्याची कल्पनाच कशी होती ही बघण्यासारखे होते. महाराष्ट्रवर राज्य करणे म्हणजे सर्वांना   सरळ करणे अशीच जर त्यांची कल्पना होती. त्यांच्या मनात राज्याच्या विकासाचा विचार कधी येत असेल का ? असा प्रश्न पडायचा. राज ठाकरे यांनीही त्यांचीच नक्कल करायला  सुरूवात केली आहे ती सर्वार्थाने नक्कल आहे.  राज ठाकरे यांचीही भाषा तशीच आणि विचार करण्याची पद्धतही तशीच.

आता त्यांची महाराष्ट्राची जनसंपर्काची एक फेरी जवळ जवळ पूर्ण झाली आहे. या फेरीत त्यांनी  विकासाची नवी काही कल्पना मांडली आहे किंवा राज्यापुढे असलेल्या काही समस्यांवर नवा इलाज सुचविला आहे असे काही दिसलेले नाही. पण सत्ताधारी पक्षाच्या चुका दाखवणे आणि त्यावर टीका करणे असाच त्यांचा एकंदर  नकारात्मक कार्यक्रम जारी आहे. तेही आपल्या हाती महाराष्ट्र सोपवावा असेच आवाहन करीत आहेत पण तसे आवाहन करतानाच ते तसा महाराष्ट्र हातात आल्यावर काय करणार आहेत याची झलकही दाखवत आहेत.

राज ठाकरे यांनी अमरावती येथे शेतकऱ्याची समस्या मांडली आणि शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले. कारण अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी शेतीऐवजी इंडिया बुल्स या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला दिले जात आहे. ही समस्या नेमकी काय आहे आणि ती कशी सोडवावी याचे काही मार्ग आहेत. पण राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न सोडवून दाखवला. त्यांनी इंडिया बुल्सच्या मुंबईतल्या कार्यालयावर दोनदा आणि अमरावतीतल्या कार्यालयावर एकदा हल्ला केला. या हल्ल्याने प्रश्न सुटला का आणि त्यामुळे इंडिया बुल्सचे पाणी शेतकर्यांरना मिळायला सुरूवात  झाली का यावर वेगळी चर्चा आयोजित करता येईल पण या प्रकाराने मनसेची कोणताही प्रश्न सोडवण्याची पद्धत काय असेल यावर चांगलाच प्रकाश पडला.

राज्यात अनेक समस्या निर्माण होत असतात. त्याच्या संबधी कोठून तर अर्धवट माहिती मिळवून आपले मत असे उथळपणे ठरवता येत नसते. ज्यांना महाराष्ट्र स्वबळावर ताब्यात घ्यायचा आहे आणि तो नरेंद्र मोदीच्या गुजरातसारखा चालवून दाखवायचा आहे त्यांना राज्यातले प्रश्न असे कार्यालयवर हल्ले करून सोडवता येत नाहीत. त्यांना त्या प्रश्नातल्या दोन्ही पक्षांत विश्वास निर्माण करता आला पाहिजे.

अमरावती जिल्ह्यातील  इंडिया बुल्सच्या  मुंबई कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यासबंधांत पोलिसांनी १५ जणांना अटकही केली होती. या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच याच मनसेच्या कार्यकर्त्यांनी  अमरावतीतील या कंपनीच्या कार्यालया वर सुध्दा हल्ला केला. त्याच दिवशी पुन्हा मुंबईच्या कार्यालयावर हल्ला केला. अमरावतीतील हल्ल्यामागे राज ठाकरे यांची चिथावणी होती. कारण त्यांनी अमरावतीत झालेल्या आपल्या भाषणात हा विषय चर्चिला होता. अमरावती जवळील शेतकऱ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले धरणाचे पाणी या औष्णिक वीज केंद्राला दिले जात आहे आणि हा शेतकर्यां वर अन्याय आहे असा दावा राज ठाकरे यांनी या सभेत बोलताना केला.

इंडिया बुल्स औष्णिक वीज केंद्रात १३५० मेगावॉट वीज तयार केली जाते आणि त्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्पाचे ८ कोटी घनमीटर पाणी दिले जात आहे. हे पाणी असे फिरवल्यामुळे २५ हजार शेतकर्यांवचे नुकसान होणार आहे. असा दावा केला जात आहे. एका स्वयंसेवी संघटनेने या संबंधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. महाराष्ट्र पाणी टंचाईने तळमळत असताना अशा प्रकारे शेतकऱ्याचे पाणी काढून ते औष्णिक वीज केंद्राला दिले जात असेल तर तो शेतकऱ्यावर अन्याय ठरेल असे या स्वयंसेवी संघटनेचे म्हणणे आहे.

वास्तविक पाहता सध्या महाराष्ट्र जेवढा पाण्याच्या टंचाईने त्रस्त आहे तेवढाच तो वीज टंचाईनेसुध्दा त्रस्त आहे. तेव्हा वीज निर्मिती झालीच पाहिजे आणि त्यामुळेच राज्य सरकारने पाण्याचा वापर करताना शहरांना पाणी पुरवणे अगत्याचे ठरविले आहे. त्याखालोखाल औद्योगिक प्रकल्पांना पाणी दिले जाते. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात दाखल झालेले आहे. त्यामुळे त्यावर आताच टिप्पणी करणे योग्य होणार नाही. परंतु राज ठाकरे यांच्यासारखे नेते वस्तुस्थितीची माहिती न घेता कुठेतरी छापून आलेल्या बातम्यांच्या आधारावर सभेत बोलताना  कोणावर तरी अन्याय झाल्याची आवई उठवतात आणि लोकांना चिथावण्याचा प्रयत्न करतात.

८ कोटी घनमीटर पाणी म्हणजे नेमके किती आणि त्यातून २५ हजार शेतकऱ्याना पाणी दिले गेले असते तर त्यातून किती जमीन भिजली असती याची माहिती त्यांनी काढायला हवी. एवढ्या शेतकऱ्याना खरोखर ८ कोटी घनमीटर पाणी पुरते का आणि त्याऐवजी ते औष्णिक वीज केंद्राला दिले तर त्यातून निर्माण होणारी वीज आणि त्या विजेच्या वापरातून निर्माण होणारे औद्योगिक उत्पादन हे किती आहे याची माहिती काढणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. राज्य करण्याची इच्छा असणारांची ती जबाबदारी असते. हल्ला करणे हे सत्ता मिळवू इच्छिणारांचा मार्ग नाही ती तर गुंडगिरी आहे.