नवी दिल्ली – टीम इंडियाने रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार फलंदाजीच्या बळावर कांगारुला धूळ चारत इतिहास रचला. या विजयासह भारताने ही मालिका ४-० ने कांगारुला क्लीन स्वीप देत आपल्या नावे केली. दरम्यान या सामन्या वेळी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी इशांतला दंड करण्यात आला आहे. तर रविंद्र जडेजाला सामना आधीका-यांनी समज दिली आहे.
आचारसंहितेचा भंग; इशांतला दंड
चौथ्या कसोटी सामन्यात तिस-या दिवशी पॅटिन्सला बाद केल्यानंतर उत्साहाच्या भरात त्याला पॅव्हेलियनकडे जाण्याचा केलेला इशारा वेगवान गोलंदाज ईशांतला महाग पडला. हा इशारा आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग मानत सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी त्याला सामनानिधीच्या १५ टक्के कपातीच्या दंडाची शिक्षा केली. त्याचवेळी रविंद्र जडेजाने डेविड वॉर्नरला पायचित केल्यानंतर त्याला जडेजाने पव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला. त्यावेळी पंचानी जडेजाला समज दिली. लेगअंपायरने अशी चूक पुन्हा करु नको असे फर्मान काढताच या दोघांच्यामध्ये सचिन आला व त्याने जडेजाला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर जडेजा शांत झाला व पंचही आपल्या जागेवर गेले.
क्लीन स्वीप देण्याचा पराक्रम ऑस्ट्रेलिया संघाने १९२० मध्ये पहिल्यांदा केला. त्या वेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार वॉर्विक आर्मस्ट्राँगने इंग्लंडला नमवून हा इतिहास रचला होता. त्यानंतर आता भारताने ऑस्ट्रेलिया संघाला क्लीन स्वीप देत असा विक्रम केला आहे.
