भाजपाची परीक्षा

बघता बघता कर्नाटकातली विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत 6 मे रोजी एकाच टप्प्यात राज्याच्या सर्व 224 मतदारसंघात मतदान होईल आणि आठ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार. भारतीय जनता पार्टीचे नेते बी.एस. येडीयुरप्पा यांनी पक्षाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला आहे. निदान तसा त्यांचा दावा तरी आहे. कर्नाटकात भाजपा म्हणजे येडीयुरप्पा आणि येडीयुरप्पा म्हणजे भाजपा हेच समीकरण आहे, आपल्या शिवाय पक्ष वाढू शकणार नाही आणि टिकूही शकणार नाही असा त्यांचा भ्रम अजूनही आहे. म्हणून या निवडणुकीत त्यांच्या या दाव्याचा निकाल लागणार आहे. त्यांच्या कथित प्रभावाची ही खरी परीक्षा आहे. नुकत्याच झालेल्या नगर पालिकांच्या निवडणुकीत त्यांना फार मोठे यश मिळाले नाही पण ते भाजपाची सत्ता घालवू शकतात असे म्हणता येईल एवढ्या जागा त्यांना मिळाल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे काँग्रेसच्या आशा बळावल्या आहेत. कारण या निवडणुकांत काँग्रेसने बरीच मुसंडी मारली आहे. राज्यातल्या नगरपालिकांच्या एकूण पाच हजारावर जागांपैकी एक हजार नऊशे जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या जागा सोळाशेवरून तीनशेने वाढल्या आहेत तर भाजपाच्या जागा बाराशेवरून घटून नऊशे झाल्या आहेत. नगर पालिका निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणिते बांधता येतीलच असे काही सांगता येत नाही पण आपल्या जागा तीनशेने कमी होणे आणि आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या जागा तीनशेेने कमी होणे या गोष्टी काँग्रेसची उमेद वाढायला कारणीभूत ठरणार नाहीत असे कोणीच म्हणू शकणार नाही. असे असले तरी मावळत्या विधानसभेतले चित्र जरा वेगळेच दिसत आहे. तिच्यात येडीयुरप्पांच्या कर्नाटक जनता पक्षाचे 12 आमदार वगळूनही भाजपाकडे बहुमत आहे. भाजपाकडे 116 जागा आहेत. तर सत्तेची उमेद बाळगणार्‍या काँग्रेसच्या हातात आहेत केवळ 80 जागा. या दोन पक्षातला फरक मोठा असला तरीही भाजपाने ज्या प्रमाणात जनतेचा भ्रमनिरास केला आहे ते प्रमाण पाहिल्यास काँग्रेसला हा फरक कापून सत्तेच्या भोज्ज्याला स्पर्श करणे कसे शक्य आहे हे लक्षात येते. तसा काँग्रेस पक्षाला कर्नाटक काही नवा नाही. या राज्यात काँग्रेसने कधी काळी सत्ता भोगलेली आहे. पक्षाची राज्यव्यापी संघटना आहे. पण बंगारप्पा काँग्रेसमधून बाहेर पडल्यापासून पक्षाला बराच मोठा फटका बसला आहे. कर्नाटकात जनता दलाने देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली कधीकाळी बहुमत मिळवले होते. आता त्यांचे केवळ 28 आमदार या सदनात आहेत. पण अजूनही देवेगौडा सत्ता प्राप्त करण्याची आशा बाळगून आहेत. त्यांचे स्वप्न पुरे होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यांची काही गणिते तयारच आहेत. राज्यात भाजपाने सत्ता मिळवली खरी पण या पक्षाला आपले वर्चस्व निर्माण करता आलेले नाही. दक्षिणेत दिग्विजय करण्यासाठी कर्नाटकात पाय रोवून उभे राहण्याचे मनसुबे भाजपा नेत्यांनी रचले होते पण त्यांना ते शक्य झाले नाही. आपले सरकार भ्रष्टाचारमुक्त आहे हे तर दाखवता आले नाहीच पण स्थिर सरकारही देता आले नाही. पाच वर्षात तीन मुख्यमंत्री झाले. यातला एक नेतृत्वबदल येडीयुरप्पांच्या भ्रष्टाचारामुळे अपरिहार्य होता. त्यांच्या जागी सदानंद गौडा यांना नेमले पण वर्षभरातच त्यांना हटवून जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री केले. हा दुसरा बदल का केला याचा काही तर्क देता येत नाही. येडीयुरप्पा हट्टाला पेटले म्हणून गौडा यांना हटवले पण काही दिवसात येडीयुरप्पाच पक्षाबाहेर पडले. भ्रष्टाचार आणि अस्थिरता यामुळे भारतीय जनता पार्टी कर्नाटकातल्या मतदारांच्या मर्जीतून उतरली आहे. तरी तिचे नेते पुन्हा आपल्यालाच सत्ता मिळणार या भ्रमात आहेत. खरे तर त्यांचा पराभव अटळ आहे. मताचे गणितही भाजपाच्या विरोधात जाणारे आहे. आजवर कर्नाटकामध्ये भाजपाला मिळालेले यश काँग्रेस आणि जनता दल यांच्यातल्या मतविभागणीमुळे मिळत होते. 1991 साली रामजन्मभूमीचे आंदोलन जसे तापायला लागले तसे भाजपाने कर्नाटकात हिंदुत्वाची हवा निर्माण करायला सुरुवात केली. त्यामुळे हिंदुत्ववादी मते भाजपाच्या मागे उभी राहिली. काँग्रेस आणि जनता दलामध्ये सेक्युलर मतांचे विभाजन झाले आणि भाजपाला सत्ता मिळाली. आता मात्र नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीची स्वत:ची म्हणून असलेली मते केवळ विभाजितच नव्हे तर त्रिभाजित झाली आहेत. भाजपाची कमिटेड मते येडीयूरप्पा यांचा कर्नाटक जनता पक्ष आणि बळ्ळारी जिल्ह्यातील रेड्डी बंधूंचा बी.एस.आर. काँग्रेस या दोन पक्षांमुळे फुटली आहेत. ही फूट काही किरकोळ नाही. त्याचा फटका भाजपाला बसणार त्यामुळे काँग्रेसच्या आशा वाढल्या आहेत पण देवेगौडा यांच्या मते लोक भाजपाला मते देणार नाहीत आणि काँग्रेसलाही मतदान करणार नाहीत. त्यांना तिसरी शक्ती म्हणून जनता दल(से)लाच मते द्यावी लागणार आहेत. एकंदरीत तिथे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही पण शेवटी मतदारांना कसले का होईना पण सरकार निवडून देणे अगत्याचे आहे.