तेल अवीव दि. २१ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व जगातील सर्वात पॉवरफुल मॅन म्हणून ओळखले जाणारे बराक ओबामा इस्त्रायलच्या एतिहासिक भेटीवर आहेत. मात्र येथे त्यांच्यावर अत्यंत अवघड प्रसंग ओढवला असल्याचे वृत्त आहे. ओबामा पहिलीच भेट देण्यासाठी तेल अवीवला जात असताना रस्त्यातच त्यांची लिमो बंद पडल्याने त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचे समजते.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे मुळातच बडे प्रस्थ. त्यात ते परदेशवारीवर गेलेले आणि तिथे त्यांची गाडी बंद पडावी ही मोठी नामुष्की तर खरीच. पण गाडी बंद पडण्यामागचे कारण अधिकच धक्कादायक आहे. या सशस्त्र आणि कोणत्याही हल्ल्यापासून संरक्षण देऊ शकणार्या् कॅडिलेक गाडीत कुणीतरी चुकून डिझेल ऐवजी पेट्रोल भरले आणि दोन्ही इंधने मिक्स झाल्याने गाडी रस्त्यातच बंद पडली. यामुळे जगाची महासत्ता म्हणवून घेणार्याक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गाडी बंद पडल्याने अखेर ओबामा ताफ्यातील दुसर्या गाडीत बसले आणि अध्यक्षांची ही गाडी एका ट्रकवर चढवून दुरूस्तीसाठी नेण्यात आली असे वृत्त डेली मिररने दिले आहे. मात्र अमेरिकेचे गुप्तवार्ता सेवा प्रवक्ते एडविन डोनोवन या संदर्भात खुलासा करताना म्हणाले की यंत्रात कधीही बिघाड होऊ शकतो यामुळे आम्ही परदेशात नेहमीच जादा वाहनांचा ताफा मॅकेनिकसह सज्ज ठेवत असतो. गाडीत मॅकॅनिकल दोष आल्याने ती बंद पडली.