देवेंद्र फडणवीसांवरील टीकेचा भाजप नेत्याने घेतला समाचार


मुंबई – सध्या आणीबाणी शब्दावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अघोषित आणीबाणी महाराष्ट्रात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात घोषित आणीबाणी आहे का? असा खोचक सवाल केल्यानंतर सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून याच मुद्द्याला धरून आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा ज्यांना त्रास होत आहे, त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकूमशाही प्रवृत्तीची भीती वाटत नाही का? बऱ्याच दिवसांनी फडणवीसांना सूर लागल्याचे वाटत होते, पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडल्याचा टोला शिवसेनेने फडणवीसांना लगावला. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

अतुल भातखळकर यांनी ‘लोकसत्ता.कॉम’च्या बातमीची लिंक शेअर करून शिवसेनेने केलेल्या टीकेचा समाचार घेतला. सत्तेवर असूनही ज्यांच्या तुतारीची पिपाणी झाली, त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सुरांची चिंता करू नये, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. महाराष्ट्रात आजवर डौलाने फडकणारा भगवा खाली खेचण्याची हिंमत तुमचे पोलीस करतात हे राज्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवाळाची चिंता करा, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सडकून टीका केला.

आजच्या सामनाच्या अग्रलेखात बऱ्याच दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांना सूर लागला असल्याचे वाटत होते, पण त्यांना पहिली तान घेताच टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणता राग कोणत्या वेळी गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. फडणवीस यांनी आणीबाणीसंदर्भात कोणतीही ठोस उदाहरण समोर आणले नाही. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो फसल्याचे नमूद करण्यात आले आहे.