
वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीच्या आपातकालीन वापरासाठी अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका आरोग्य सेविकेला लस देऊन अमेरिकेत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका तसेच जगभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनावर अमेरिकेत वापरण्यात येणारी ही पहिली लस आहे.
अमेरिकेत कोरोना लसीकरणाला सुरुवात, या व्यक्तीला दिला पहिला डोस
ही लस फायझरने आपल्या जर्मन भागीदार कंपनी बायोएनटेक सोबत मिळून विकसित केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे. या लसीच्या लसीकरणास वापराला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिलाच देश ठरला होता. ब्रिटनमध्ये देखील लसीकरणाला सुरुवात झाली आहे आणि आता लवकरच बहारीन आणि कॅनडातही लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
फायझर-बायोएनटेक या कंपनीने भारतातही आपातकालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे. भारतात एकूण आठ लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु असून भारतात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
एका ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना अदर पुनावाला यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, डिसेंबर अखेरपर्यंत एसआयआयला व्हॅक्सिनच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते. परंतु, या लसीच्या वापरासाठी परवानगी नंतर मिळू शकते. यावेळी बोलताना त्यांनी, जानेवारी, 2021 मध्ये भारतात कोरोना लसीच्या लसीकरणाच्या अभियानाला सुरुवात होऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
