पुणे, दि. 18 (प्रतिनिधी) – देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी अद्यापही भांडवलशाही मक्तेदारांच्या ताब्यात आहे. मात्र हेच भांडवलशाह दलितांना अस्पृश्य मानत असल्यानेच इत्नया वर्षानंतरही दलितांचे शोषण थांबलेले नाही, अशी खंत दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केली. ही भांडवलशाही नष्ट करायची असेल तर सर्व दलितांनी संघटित होऊन सवर्णांची मक्तेदारी झुगारा, असे आव्हानही त्यांनी केले.
पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारम पदमश्री नामदेव ढसाळ यांना प्रदान करण्यात आला. 1 लाख 11 हजार 111 रुपये रोख आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे, माजी आमदार उल्हास पवार, महापालिकेच्या क्रिडा समितीचे अध्यक्ष अविनाश बागवे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, नगरसेविका सुनंदा देवकर, नगरसेवक रविंद्र माळवदकर यांच्यासह दलित चळवळीतील अनेक नेते याप्रसंगी उपस्थित होते.
समाजाला योग्य दिशा मिळावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले. त्यामुळे समाज सुखी झाला आहे. मात्र त्यांच्याच वारसांना आजही समाजात अस्पृश्यपणे वागवले जात असून त्यांच्यावरील अत्याचार अद्याप थांबलेले नाहीत, अशी खंत व्यक्त करुन ढसाळ म्हणाले; स्वातंत्र्यानंतरही या देशातील जाती प्रथा अद्याप नष्ट झाली नाही. त्यामुळे समाज दिशाहिन होत असताना राज्यकर्त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी दलित नेत्यांत मोडामोडीचे राजकारण केले. परिणामी घोर अन्याय होत असतानाही या समाजाची कधीही अभेद्य, असे संघटन कधीच होऊ शकले नाही.
या देशावर नेहमीच भांडवलशाहांची मक्तेदारी राहिली आहे. हेच भांडवलशाह त्यांच्या स्वार्थासाठी आणि अस्तित्वासाठी लढाई करत आहेत. त्यात दलितांचा मात्र नाहक बळी जात असून दलित समाजही त्याला बळी पडत आहे. परिणामी हे भांडवलशाहा आजही दलितांना एकविसाव्या शतकातही अस्पृश्य समजत आहे. ही निश्चितच दुर्दैवाची बाब आहे. त्यातूनच दलितांवरील अत्याचारात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र हा अन्याय आता सहनशक्तीच्या पलिकडे गेला असून ही बाब आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळेच सर्वदलितांनी आता संघटित होऊन सवर्णांची ही मक्तेदारी झुगारली पाहिजे, अशी अपेक्षाही ढसाळ यांनी व्यक्त केली.
