तेलंगणाच्या मागणीवरून गोंधळ ; १५ आमदार निलंबित

हैदराबाद- वेगळ्या तेलंगणाची मागणीसाठी सोमवारी आंध्र विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणा देत गोंधळ घातला. या प्रकरणी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) पंधरा आमदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून वेगळया तेलगनाची मागणी केली जात आहे.

सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानतर काही वेळातच अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन टीआरएसच्या आमदारांनी वेगळ्या तेलंगणाची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नडेन्डला मनोहर यांनी विधानसभेचे कामकाज काही वेळासाठी पहिल्यांदा तहकूब केले. काही वेळानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतरही टीआरएसच्या आमदारांनी गोंधळ सुरूच ठेवला.

गोंधळ कमी होत नसल्याचे पाहून अध्यक्षांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यास सांगितले. सभागृहात आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मान्य झाला. टीआरएसच्या १५ आमदारांना सोमवारी दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने कामकाज सुरळीत पार पडले.