राज्यात वीज पडल्याने सात जणांचा मृत्यू

बीड- राज्यच्या काही भागात शुक्रवारी रातरी अचानक वादळी वारे व अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यभरात शुक्रवारी विविध ठिकाणी वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यात वीज कोसल्याने दोन जणांचा तर सोलापूर जिल्ह्यत एक जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीररित्या भाजले असल्याचे समजते.

बीड शहराजवळ असलेल्या नाळवंडी नाका भागातील वीटभट्टीवर शुक्रवारी रात्री वादळी पावसात वीज कोसळल्याने महंमद रफिक शफिक (२५), अजब नसीर तडवी (२०, रा. अकोले ) मरण पावल्याचे समजते. तर मनूरवाडी शिवारात लिंगेश्वर खुरपे यांच्या शेतात वीज पडून काम करत असलेला सालगडी शेख हारुण (रा.हदगाव नखाते, ता.पाथ्री, जि. परभणी) याचा जागीच मृत्यू झाला. शिरूर कासार तालुक्यात निमगाव मायंबा येथेही वीज पडून लक्ष्मीकांत विश्वनाथ तातोडे (४७, रा. निमगाव मायंबा) यांचा मृत्यू झाला. अक्षय परमेश्वर देवकर (१६) गंभीर भाजला. तिसर्‍या घटनेत नांदेवली येथे वीज पडून ज्ञानेश्वर हरिभाऊ थिटे (२६) गंभीर जखमी झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले बसस्थानकात दोन प्रवाशांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील तरणफळ (ता. माळशिरस) येथे शेतात काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. तर राज्यच्या काही भागात शुक्रवारी रात्री अचानक वादळी वारे व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हाता तोंडाशी आलेले फळबगाचे पावसाने मोठे नुकसान झाले असल्याचे समजते.