राम सिंहची आत्महत्या

दिल्लीमध्ये गेल्या १६ डिसेंबरला झालेल्या आणि देशभर गाजलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा राम सिंह ज्या बसमध्ये हा बलात्काराचा प्रकार घडला त्याचा ड्रायव्हर होता आणि त्या पीडित तरुणीला तसेच तिच्या मित्राला लोखंडी कांबीने मारहाण करण्यात तो आघाडीवर होता. म्हणजे तो अट्टल गुन्हेगारच आहे. त्यामुळे त्याला शिक्षा होणे गरजेचेच होते. त्याच्यासह पाच जणांना अटक करून कच्चे कैदी म्हणून तिहार कारागृहात टाकण्यात आले होते. परंतु बलात्काराच्या त्या घटनेमुळे भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरच तिहारमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मनात सुद्धा प्रचंड राग निर्माण झालेला होता. त्यामुळे या पाच आरोपींना जेव्हा तिहार तुरुंगात आणण्यात आले तेव्हा या कैद्यांचाही राग उफाळून आला आणि त्यांनी या पाच जणांना कारागृहातच बेदम मारहाण केली. म्हणजे विविध गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आरोपी आणि गुन्हेगारांना सुद्धा चीड यावी इतका या लोकांचा सामूहिक बलात्कार भयानक होता.
   
या मारहाणीनंतर या पाच जणांना एकाच बराकीत डांबण्यात आले आणि त्यातल्या एका अल्पवयीन आरोपीला त्याचे वय १८ च्या आत असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे सुधारगृहात पाठविण्यात आले. याचा अर्थ उघड आहे की, आत्महत्या करणारा राम सिंह त्या कोठडीमध्ये एकटा नव्हता. त्या घृणास्पद गुन्ह्यातील अन्य चार भागीदारही त्याच्या सोबत त्याच्या कोठडीत होते. म्हणजे याच्या आत्महत्येची माहिती त्यांना असल्याची शक्यता आहे. मात्र हे तिघे आता हात वर करत आहेत आणि आपला या आत्महत्येशी काही संबंध नाही असा खुलासा करत आहेत. मुळात राम सिंहच्या वडिलांनी आपल्या मुलाची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केला असून त्याच्या हत्येची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अशा प्रकारे कोणाचाही संशयास्पद मृत्यू झाला की, मरण पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईक त्यामध्ये घातपाताचा संशय व्यक्तच करत असतात. तशा प्रकारे राम सिंहचे वडील त्याच्या आत्महत्येविषयी संशय व्यक्त करत आहेत, असे म्हणण्यास जागा आहे. परंतु मिळालेली हकीकत तसे सांगत नाही.
   
काही दिवसांपूर्वी राम सिंहला न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याचे त्याच्या वडिलांशी बोलणे झाले होते. त्यावेळी राम सिंहने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते, असे त्याचे वडील सांगत आहेत. अर्थात जी व्यक्ती तीन महिन्यांपासून तुरुंगात बंद आहे तिच्या जीवाला तुरुंगातल्या तिच्या सहकार्याआ शिवाय कोणाचा धोका असणार आहे? म्हणजे त्याच्या वडिलाचे म्हणणे खरे मानले तर त्याच्या सोबत त्याच्या बराकीत असलेल्या त्या तिघांकडेच संशयाची सूई वळत आहे. पण हे तिघे तर त्याचे जीवलग सहकारी आहेत. मग ते त्याला का मारतील, असा प्रश्न निर्माण होतो.

कदाचित राम सिंहवर हे तिघे या सगळ्या प्रकाराची जबाबदारी टाकत असतील. कारण बस थांबवणे, त्या मुलीला आणि तिच्या मित्राला आत घेणे आणि बस न थांबवता आत बलात्कार सुरू असूनही ती भरधाव पुढे नेणे या सगळ्या प्रकाराला राम सिंहच जबाबदार आहे. एकंदरीत त्याच्यामुळेच आपण या संकटात सापडलो, असा त्याचे ते मित्र त्याला दोष देत असतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या तरी केली असावी किवा त्या तिघांनी तरी त्याला मारून टाकले असावे असे संभवते.    एकंदरीत या प्रकरणातला एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे तर दुसरा आत्महत्या करून सुटला आहे.
   
या आरोपींनी फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे. ती मान्य होईल की नाही यावर अजूनही संशय आहे. परंतु राम सिंहने तरी स्वतःच फाशी घेऊन स्वतःला शिक्षा घडवली आहे. त्याच्या वडिलांनी आता कितीही आकांत केला तरी त्यात काही अर्थ नाही. कारण राम सिंहचे भवितव्य तेच होते. आता केवळ तिघांवर आरोपपत्र लावले जाणार आहे. या प्रकाराने तिहार कारागृहातल्या सुरक्षेचे मात्र वस्त्रहरण झाले आहे. दक्षिण आशियातला सर्वात मोठा तुरुंग म्हणवले जाणारे हे कारागृह अनेक गोष्टींमुळे बदनाम झालेले आहे. हे म्हणायलाच कारागृह आहे, परंतु तिथे पोलिसांचे राज्य चालत नाही. दादागिरी करणारे जुने कैदी आणि त्यांच्याशी हातमिळवणी करणारे बाहेरचे गुन्हेगार यांचाच वट्ट या कारागृहात असतो. तिथे वेश्या व्यवसायापासून टोळी युद्धापर्यंत सारे प्रकार सुखेनैव सुरू असतात. त्यामुळे अशा या कुप्रसिद्ध कारागृहामध्ये एक आत्महत्या झाली ही गोष्ट तशी किरकोळ आहे. परंतु आत्महत्या करणारा कैदी हा देशभर गाजलेल्या प्रकरणातला आरोपी होता त्यामुळे त्याला महत्व आले आहे.

Leave a Comment