वाघांच्या अवयवांच्या विक्रीचे केंद्र दिल्लीत

नवी दिल्ली: सुंदरबन आणि पश्‍चिमी घाटांभोवतालच्या ठिकाणांवर वाघांचे अवयव आणि कातडी, नखे यांचा बेकायदेशीर व्यापार चालत असल्याचे डब्ल्यूडब्ल्यूएफच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डब्ल्यूडब्ल्यूएफ संस्थेच्या अहवालात त्यांनी दावा केला आहे की चीन, भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड यांचा समावेश असलेल्या देशांच्या दरम्यान १३ वाघांची बेकायदेशीर शिकार झाली आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, याबाबतच्या अभ्यासात असे उघड झाले आहे की, दिल्ली हे वाघांच्या अवयवांच्या विक्रीचे देशातील महत्त्वाचे बेकायदेशीर व्यापारी केंद्र बनले आहे.

अहवालात म्हटले आहे की, कार्बेट अभयारण्य आणि रामनगर जंगलातील विभागात वाघांची जास्त संख्या असल्याने तेथे त्यांची शिकार केली जाते. या भागातील वाघांचे समान आकाराचे कातडे आढळून येते. सन २०१० ते २०१२ मधील नवीन सर्व्हेक्षणानुसार गेल्या १३ वर्षांपासून आशियाई देशात १४०० पेक्षा जास्त वाघांची शिकार केली गेल्याचे निदर्शनास आले आहे.

वाघांची कातडी, नखं, हाडांच्या भागांचा व्यापार करण्यासाठी दर वर्षी सुमारे ११० वाघांची हत्या केली जाते आणि या बेकायदेशीर व्यापारापैकी २६ टक्के व्यापार दिल्लीतून केला जातो; असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.