मद्याच्या विळख्यात महाराष्ट्र

पुणे: महाराष्ट्राला एक उज्ज्वल परंपरा आहे. संस्कृती आहे. थोर पुरूषांच्या कर्तबगारीचा इतिहास आहे आणि देशात एकप्रकारचा दर्जा आहे. महाराष्ट्र म्हणजे एक वेगाने विकास होणारे राज्य! ज्या राज्यात उजाड रानमाळावर सोन्याची शेती पिकवणारे शेतकरी आहेत. शून्यातून विश्‍व निर्माण करणारे उद्योजक आहेत. फक्त देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक आशेचा किरण दाखविणारे युवक आहेत. परंतु हेच युवक काहीसे वेगळ्या वळणाने जात असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राची ओळख अवघ्या जगभरात शाहू, फुले, आंबेडकर, टिळक, सावरकर यांचा महाराष्ट्र अशी होती. पण आता ही ओळख पुसली जात आहे. महाराष्ट्र नव्हे तर ‘मद्यराष्ट्र’ म्हणून राज्याची नवी ओळख होत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत राज्यात मद्य पिणार्‍यांची संख्या सतत वाढत असून, यामध्ये तरुणाईचा अधिक समावेश असल्याचे एका पाहणीत आढळून आले असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.

राज्यात मागील काही वर्षांची उत्पादनशुल्काची वाढ जरी लक्षात घेतली तरी आपल्याला सहजपणे हे लक्षात येईल. सन २००९- १० या आर्थिक वर्षात राज्यशासनाला ५ हजार ५६ कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क मिळाले होते. त्यानंतर सन २०१०- ११ या वर्षात त्यात ४०६ कोटी रुपयांची वाढ होऊन सुमारे ५ हजार ९६२ कोटी रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क मिळाले. तर सन २०११- १२ या आर्थिक वर्षात यात २ हजार ६५९ कोटींची मोठी भर पडली असून राज्याचे उत्पादन शुल्क सुमारे ८ हजार ६२१ कोटींवर पोहोचले. मागील वर्षी हेच उत्पादन सुमारे ९ हजार ५०० कोटी होते. म्हणजे त्यात वाढ होऊन एका वर्षात राज्याच्या तिजोरीत ८७९ कोटींची वाढ झाली आहे. हे उत्पादनशुल्क सतत वाढत चालले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडताना दिसत आहे. तर राज्याच्या या उत्पादन शुल्कात सातत्याने वाढ व्हावी म्हणून राज्य सरकार या विभागाला सतत कर वाढविण्यासाठीचा आग्रह करीत असून उत्पन्नाचे लक्ष्यही वाढवून देत आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे तीनच्या निष्कर्षाकडे सहज पाहिले तरी या समाजातील अनेकांना धक्का बसेल अशी स्थिती आहे. त्याच्या सर्व्हेक्षणाचा विचार करता २००७ मध्ये देशातील ३२ टक्के लोकसंख्या दारू पीत होती. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रात जेवढी दारू तयार होते; त्यापैकी ६५ टक्के दारू एकट्या भारतात विकली जाते. विशेष म्हणजे सुमारे १० ते १३ टक्के लोकांनी आपण नियमित दारू पीत असल्याचे मत नोंदविल्याचे सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते यापेक्षा ही संख्या खूप मोठी असेल. याच सर्वेक्षणात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मागील दशकात दारू पिणार्‍या तरुणांच्या वयामध्ये मोठी घट दिसून आली आहे. हे प्रमाण सरासरी २८ एवढे होते, ते आता १९ पर्यंत खाली आले आह. आता हेच वय प्रत्यक्षात सतरापर्यंत आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्रात आज ‘श्यामची आई’ सिनेमाला बरोबर ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या पुस्तकाने व सिनेमाने मराठी मुलांचे भावविश्‍व समृद्ध व संस्कारशील केले. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून माता-पित्यांनी त्या काळात ही पुस्तके डोक्यावर घेतली, तर सिनेमाला मोठी गर्दी केली. त्यातून ४२ रात्रीतून अनेक संस्कार झाले. अनेक पिढ्या उभ्या राहिल्या. आज त्या संस्काराच्या रात्री हद्दपार झाल्या असून आज तरुणाई मद्य रिचवण्यात रात्र संपवित आहेत. रात्री त्याच असल्या तरी ६० वर्षात साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा महाराष्ट्र बदलला आहे. मुलांच्या मनावर संस्कार करण्यासाठी आचार्य अत्रेंनी ‘श्यामची आई’ सिनेमाची निर्मिती केली. त्या महाराष्ट्राची आजची संस्काराची झालेली वाताहत कोणालाही चिंता करायला लावणारी आहे.