महिला दिनाच्या निमित्ताने…

महिलांच्या परिस्थितीत बदल झाला आहे. सध्या दूरदर्शनवर सुरू असलेली ‘उंच माझा झोका’ ही मालिका बघतो तेव्हा त्या काळातली महिलांची अवस्था आणि आजची अवस्था यातील फरक प्रकर्षाने जाणवतो. त्या काळात महिलांनी शिक्षण घेणे एवढेच नव्हे तर घराच्या बाहेर पडणे हे सुद्धा पाप समजले जात होते. पुरुषांचे समाजावर मोठे वर्चस्व होते. त्या अवस्थेत एखाद्या महिलेने शिक्षणाचा आग्रह धरणे आणि पुरुष करतात ती कामे करणे हे मोठे दिव्यच होते. अशा अवस्थेतही अनेक महिलांनी आणि त्यांना प्रोत्साहन देणार्याह पुरुषांनी धाडसाने स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडला. लोकांनी त्यांचा छळ केला, त्यांना बहिष्कृत केले. अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा संकटासमोर न डगमगता या समाज सुधारकांनी आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले आणि त्याचीच फळे आता आपण चाखत आहोत.

आज महिला शिकत आहेत, पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात कार्यरत झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर काही क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये सहशिक्षण असते तिथे मुलांच्या आणि मुलींच्या प्रगतीचा तुलनात्मक विचार केला तर मुली मुलांपेक्षा आघाडीवर असल्याचे आढळते. आज महिलांनी घराच्या बाहेर पडणे हे पाप मानले जात नाही हे खरे. १९ व्या आणि २० व्या शतकातली ती स्थिती आज राहिलेली नाही. समाजातल्या पुरुषांनी स्त्रियांचे घराबाहेर पडणे मान्य केले आहे. पण ही मान्यता मनापासून दिलेली आहे का? हा प्रश्न मोठाच अस्वस्थ करणारा आहे. आपल्या समाजाच्या एका वेगळ्या परिस्थितीचे दर्शन या प्रश्नाच्या उत्तरात दडलेले आहे.

समाजातल्या पुरुषांनी स्त्रियांना आपल्या बरोबरचे मानून स्वातंत्र्य दिलेले आहे की, निरुपाय म्हणून दिलेले आहे हा तो प्रश्न आहे. एखादा पुरुष आपल्या पत्नीला नोकरी करण्याची अनुमती देतो. परंतु ती अनुमती स्त्री स्वातंत्र्याच्या भावनेतून देतो की, एकाच्या पगारात घर भागत नाही म्हणून देतो, हा प्रश्न आहे आणि खरे तर या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर आहे. घर भागत नाही म्हणून नाईलाजाने तो पत्नीला नोकरीवर पाठवतो. केवळ स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतच नव्हे तर सर्वसाधारणतः सर्वच सुधारणांच्या बाबतीत हा प्रश्न विचारता येतो. आपण जाती-पातीतली विषमता विसरून गेलो आहोत. आपण अस्पृश्यता पाळत नाही, याही मागे काय भावना आहे. आपण जातीय भावना विसरलो आहोत का? की परिस्थितीच्या रेट्यापुढे आपण जातीय भेदभाव सोडला आहे?

नाईलाज म्हणून स्वीकारलेल्या समाजसुधारणा नेहमीच अर्धवट असतात. बायकोला नोकरीवर पाठवून स्त्री ला स्वातंत्र्य दिल्याचा आव आणणारा नरपुंगव प्रत्यक्षात मात्र स्त्री ला कमीच लेखत असतो. नवरा-बायको दोघेही नोकरी करत असतात. परंतु नवरा नोकरीशिवाय काहीच करत नाही. बायको मात्र नोकरीही करते आणि घरची कामेही करते. तिला स्वातंत्र्य दिल्याचा आव आणणारा तिचा नवरा आपली बायको नोकरी करत आहे, तेव्हा आपण तिच्याबरोबर स्वयपाकही केला पाहिजे असे चुकून सुद्धा म्हणत नाही. स्वयपाक तर लांबच राहिला, परंतु घरकामातला एखादा चमचा इकडून तिकडे करणे एवढे साधे काम सुद्धा तो टाळतो. असे एखादे घरचे काम केले तर आपल्या मर्दपणाला बाधा येईल, अशी भीती त्याला वाटत असते. म्हणजे बायकोला नोकरीवर सोडणारा नवरा समतेचा विचार करून बायकोला स्वातंत्र्य देत नसतो, तर घरात डबल उत्पन्न यावे म्हणून देत असतो. मनातून मात्र तो बायकोला दुय्यमच लेखत असतो.

ही प्रवृत्ती केवळ मध्यमवर्गीय किवा कनिष्ठ मध्यमवर्गीय अशाच लोकांत आहे असे नाही, तर आय.ए.एस. अधिकार्यांतच्या घरात सुद्धा अशीच अवस्था आहे. आपण स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची असते हा विचार मनापासून स्वीकारलेला नाही. तसा तो स्वीकारलेला नसल्यामुळे स्त्री घराच्या बाहेर पडली आहे, परंतु ती घराबाहेर सुरक्षित नाही. तिच्या असुरक्षिततेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर तर बरीच खळबळ माजली. देशभर या संबंधाने जागृती निर्माण झाल्याचा भास निर्माण केला गेला. मात्र ही सारी खळबळ शांत होताच पुन्हा एकदा समाजात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढायला लागली आहेत. पोलीस एवढे सावध झाले, समाज जागृत झाला, कायदा कडक झाला, पोलीस सजग झाले पण तरी सुद्धा महिला अजून असुरक्षितच आहेत. कारण हा प्रश्न मनोवृत्तीतून निर्माण झाला आहे. जोपर्यंत मनोवृत्तीत फरक पडत नाही, तोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाहीत.

महिला सुरक्षिततेचा विषय असो की महिलांची कोणतीही समस्या असो ती पुरुषी मनोवृत्तीतून निर्माण झालेली आहे. म्हणून स्त्रियांना समता आणि स्वातंत्र्य पाहिजे असेल तर पुरुषांचा वर्चस्वाचा अहंगंड कमी झाला पाहिजे. परंतु तो कमी होत नाही. महिला दिन पाळला जातो, चर्चा होतात, परिसंवाद होतात आता तर महिला दिनाला कर्तबगार महिलांचा सत्कार केला जात आहे. परंतु हा वरवरचा देखावा आहे. पुरुषांच्या मनातली वरचढपणाची भावना कायमच आहे.

Leave a Comment