नवी दिल्ली: आतापर्यंत एका शहरातून दुसर्या शहरात किंवा परराज्यातील ठिकाणी जर तुम्ही गेलात तर सर्वात जास्त त्रास होतो, तो मोबाईलची रेंज आणि त्याचसोबत रोमिंगच्या मेसेजस् आणि त्याचे चार्जेस! परंतु गुरुवारी सरकारच्या वतीने घेण्यात आलेला निर्णय हा मोबाईलधारकांना दिलासा देणारा आहे. आता देशभरात मोफत रोमिंग कॉलची सुविधा येत्या ऑक्टोबरपूर्वी कार्यान्वित होईल, अशी माहिती दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली आहे.
तुम्ही तुमचा मोबाईल खिशात असताना मुंबईतून गावाकडे गेलात की पनवेल किंवा शहापूर ओलांडले की तुमच्या फोनवर दोन तीन मेसेजेस लगेच येतात. त्यामध्ये तुम्ही तुमच्या होम नेटवर्कमधून महाराष्ट्र आणि गोवा नेटवर्कमध्ये आल्याची सूचना असते. महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये तुमचे स्वागत करण्याबरोबरच तुम्हाला इंटरनेट चार्जेस किंवा इनकमिंग किंवा आऊटगोईंग आणि मेसेजेससाठी कोणता रेट लागेल याचीही माहिती देणारा एक संदेश असतो. थोडक्यात काय तर तुम्ही रोमिंगमध्ये जात असल्यामुळे तुम्हाला रोमिंगचे अतिरिक्त शुल्क लागू होते.
मात्र ऑक्टोबरनंतर हा मनस्ताप मोबाईल ग्राहकांना होणार नाही. कारण त्यापूर्वीच देशभरात कुठेही जा, तुम्हाला कुठेच रोमिंग शुल्काची आकारणी होणार नाही. ट्रायने रोमिंग मोफत करण्यासाठी एक कन्सल्टेशन पेपर तयार केला आहे. त्यावर मोबाईल सेवा पुरवणार्या कंपन्या आणि सरकार आपापली मते आणि भूमिका व्यक्त करतील. त्यानंतर ट्रायच्या शिफारसीनंतर सरकारला ऑक्टोबरपूर्वीच देशभरात रोमिंग फ्री करता येईल, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले.
भारत सरकारने इंटरनेटच्या नोंदणीसाठी नॅशनल इंटरनेट रजिस्ट्रीची दि.७ पासून सुरूवात केली. या एनआयआरचे उद्घाटन झाल्यानंतर कपिल सिब्बल पत्रकारांशी बोलत होते. मोबाईल फोन इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या सर्वांची मते आणि प्रतिक्रिया किंवा हरकती मागवण्यासाठी ट्रायने डिसेंबरमध्येच फ्री रोमिंगचा प्रस्ताव आपल्या वेबसाईटवर टाकला आहे. त्यावर सर्वाचा विचार विनिमय झाला की ट्राय त्यासाठीची अंतिम मुदत निश्चित करेल. त्यानंतर सरकारला पुढील कारवाई करता येईल, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले.
सध्या ज्या सर्कलमध्ये एखाद्या मोबाईल सेवा पुरवणार्या कंपनीची सेवा नसेल तिथे आपल्या ग्राहकाला सेवा पुरवण्यासाठी त्या राज्यात आधीच सेवा पुरवणार्या मोबाईल कंपनीला कनेक्टिंग शुल्क द्यावे लागते. अर्थातच त्याची वसुली ग्राहकांकडूनच होते. एका कंपनीने दुसर्या कंपनीकडून अशी शुल्क आकारणी केली नाही तर मोबाईल कंपन्याही त्याची वसुली ग्राहकांकडून करणार नाहीत. देशभरात सर्वत्र रोमिंग फ्री झाल्यानंतर भारतातील मोबाईलच्या प्रसारातील हा एक महत्वाचा टप्पा असेल.