चीन बनला जगातील सर्वाधिक तेल आयातदार

वॉशिग्टन दि.६ -जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश म्हणून १९७० च्या दशकापासून नंबर वन वर असलेल्या यूएसला मागे टाकत यंदा चीनने जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश बनण्याचा मान मिळविला आहे. अमेरिकेची तेल आयात डिसेंबरपासून घटली आहे. ही घट ५.९८ दशलक्ष बॅरल इतकी आहे असे एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

याच काळात चीनची तेल आयात मात्र ६.१२ दशलक्ष बॅरलने वाढली असल्याचे चीनच्या सीमाशुल्क विभागाने जाहीर केले आहे. परिणामी जगातील महत्त्वाच्या शिपिग मार्गांबाबत मोठी भूमिका बजावण्याचा दबाव बिजिगवर आला आहे. चीनने आपले धोरण यापूर्वी जाहीर केले असून शेजारी सुदान, अंगोला, इराक या देशातील तेलावर हक्क सांगता यावा म्हणून चीनी कंपन्यांनी या देशांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक यापूर्वीच सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.