आता व्हिडियोकॉन कंपनीही उतरणार बँकिंग क्षेत्रात

नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या व्हिडियोकॉन कंपनीने आता बँकिंग क्षेत्रात उडी घेतली आहे. रिझर्व्ह बँकेने कंपनीसाठी नवीन नियमावलीही जारी केली आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर कंपनी एक हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, परकीय कंपनीशी भागीदारी करणार आहे.

विमा क्षेत्रात कंपनीने लिबर्टी म्युच्युअल या कंपनीशी व्हिडीओकॉनने याआधीच करार केला असून भांडवली बाजारात व्हिडियोकॉन सक्रीय आहे. मात्र आता बँकिंग क्षेत्रातही आम्ही एक पाऊल पुढे टाकताना खूप आनंद होत आहे, असे मत व्हिडियोकॉन कंपनीचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांनी मांडले.

रिझर्व्ह बँकेनेही आम्हाला बँकिंग क्षेत्रात उतरण्यासाठी अधिकृत परवाना जारी केला असून परकीय कंपनीसोबत भागीदारी करणार असल्याचे धूत यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांतील कंपनीचा आलेख चांगला आहे. बँकिंग क्षेत्रात किती कोटींची गुंतवणूक प्राथमिक स्तरावर करणार असं विचारताच रिझर्व्ह बँकेने आम्हाला ५०० कोटींची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. मात्र आम्ही त्याहीपेक्षा जास्त म्हणजे १ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत; असेही त्यांनी सांगितले.

या बँकेचे शहरी भागासोबत ग्रामीण भागातही जाळे विस्तारण्याची योजना आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागात व्हिडियोकॉन कंपनीवर लोकांची विश्वासर्हता आहे. त्यामुळे याचा फायदा आम्हाला बँकिंग क्षेत्रात नक्कीच होईल, असे धूत सांगतात.

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करु इच्छिणा-या उद्योजकांसाठी नियमावली जारी केली आहे. त्या नियमावली अंतर्गत ज्या उद्योगांचा १० वर्षांपासूनचा आलेख चढता आहे अशा उद्योजकांना बँकिंग क्षेत्रात उतरण्यासाठी अधिकृत परवाना जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय प्राथमिक स्तरावर ५०० कोटींची गुंतवणूक तसेच बँकेच्या शेअर्समध्ये ४९ टक्के परकीय गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली आहे. या नव्या बँकेच्या अंदाजे २५ टक्के शाखा ह्या ग्रामीण भागात उघडण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्या कंपनीचे नाव बँकेच्या परवान्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे, त्या कंपनीला एक जूलै २०१३ पर्यंत आपले अर्ज रिझर्व्ह बँकेकडे दाखल करणे सक्तीचे करण्यात आले आहे.