नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे नेते राजनाथ सिंग यांनी आज केंद्र सरकारच्या कारभाराला लाखोल्या वाहिल्या. निमित्त होते पक्षाची राष्ट्रीय परिषद सभा. या परिषदेत भाषण करताना राजनाथ सिंगांनी सरकारच्या कमकुवतपणावर कडवट टीका केली. सरकारमध्ये दहशतवादाविरोधात लढण्याच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे देशात हैदराबाद स्फोटासारख्या घटना घडत आहेत; असा आरोप सिण्ग यांनी केला.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भगव्या दहशतवादाच्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी व्यक्त केलेल्या तीव्र प्रतिक्रिया आणि आंदोलनांची पक्षाध्यक्षांनी वाखाणणी केली. देशातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेला गृहमंत्री शिंदेच जबाबदार आहेत. तसेच कुंभ मेळया दरम्यान घडलेल्या दुर्घटनेलाही सरकारचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचे राजनाथ यांनी यावेळी स्पष्ट केले.
माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील ‘पूर्ती’ प्रकरणातील आरोप बिनबुडाचे असून ते राजकीय षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास करणारे गुजरात राज्य हे जगात आदर्शवत असल्यचे सांगत सिंग यांनी मोदींचेही गोडवे गाईले.
केंद्र सरकार आणि बांगलादेशाचे संबंध सरकारने जनतेसमोर स्पष्ट करावे असे आव्हान सिंग यांनी दिले.