ईशान्येतल्या तीन राज्यांत निवडणुका झाल्या. एरवी या राज्यांतल्या घटनांविषयी आपण फारच अनभिज्ञ असतो कारण ती राज्ये लहानही आहेत आणि आपल्या जीवनावर तिथल्या घटनांचा थेट कसलाच परिणाम होत नाही. आपण एकवेळ अमेरिकेच्या आणि पाकिस्तानच्या निवडणुकांवर चर्चा करू पण भारतातल्या या राज्यांची फार दखल घेणार नाही. आताही या तीन पैकी त्रिपुरा मध्ये निवडणुका झाल्या त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, तिथे डाव्या आघाडीचा कस लागला होता.
प. बंगाल आणि केरळात या आघाडीचा पराभव झाला आहे. डावी आघाडी देशाच्या अन्य भागांत नाममात्रही अस्तित्व राखून नाही. केवळ ईशान्य भारतातल्या या छोट्या राज्यात मात्र डाव्या आघाडीचे सरकार आहे. केवळ आहेच असे नाही तर तिथे असा एक मुख्यमंत्री आहे की जो धनशक्तीचा वापर न करता सातत्याने निवडून येतो. आताही तिथले मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी पाचव्यांदा विजय मिळवला आहे.
निवडणुका होण्याच्या आधी या राज्यात माणिक सरकार यांच्याच नेतृत्वाखाली सरकार निवडून येणार याची खात्री सर्वांनी दिली होती. माणिक सरकार एक निरलस कार्यकर्ता आहे. महिनाभरापूर्वी त्यांच्या संबंधाने एक बातमी छापून आली होती आणि तिची फार चर्चा झाली होती. माणिक सरकार आजवर चारदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत पण त्यांना अजूनही स्वतःचे घर नाही. ते त्यांच्या आईने विकत घेतलेल्या ४०० चौरस फुटाच्या म्हणजे वन रुम किचन स्वरूपाच्या घरात राहतात. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलले प्रमाणपत्रात त्यांची बँकेतली एकूण जमा रक्कम केवळ एक हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे. असा हा पैशाची मस्ती नसणारा माणूस निवडून येतो का, याबद्दल देशात उत्सुकता होती.
त्यांनी निवडणूक केवळ जिंकलीच आहे असे नाही तर विधानसभेच्या ६० पैकी ५० जागा जिंकल्या आहेत. त्यांच्या निवडीने चांगला संकेत मिळाला आहे. आपण असे म्हणतो की राजकारणात सभ्य लोक राहिलेले नाहीत पण माणिक सरकार यांनी असे लोक आहेत हे तर दिसून आले आहेच पण ते कमालीचे यशस्वी होतात हेही दिसून आले आहे. आपणा सर्वांनाच दिलासा देणारी ही बाब आहे. माणिक सरकार कोणत्या का पक्षाचे असेनात ते सरळमार्गी आणि भ्रष्टाचारापासून दूर असणारे निष्ठावंत राजकारणी आहेत याला आज महत्त्व आले आहे.
माणिक सरकार यांना हे यश का मिळाले यावर चर्चा सुरू आहे. कोणी याचे श्रेय त्यांच्या प्रशासनाला देत आहेत तर कोणाच्या मते हा विजय सरकार यांनी या राज्यातला दहशतवाद निपटून काढला याचा आहे. कशाचा का असेना पण पैसे न खाणार्या नेत्याचा विजय झाला आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्रिपुरात मुख्यमंत्री असे निष्कलंक चारित्र्याचे असल्यामुळे सर्व मंत्रीही तसेच आहेत आणि सरकारी यंत्रणाही तशीच आहे. देशातला भ्रष्टाचार कसा कमी करावा असा प्रश्न अनेकदा विचारला जात असतो. त्याला उत्तर सापडत नाही पण त्रिपुरातल्या निकालाकडे बघून आपण नक्कीच असे म्हणू शकतो की नेता चांगला असल्यास प्रशासनही स्वच्छ होते आणि ते स्वच्छ झाले की, दहशतवादाशीही प्रभावीपणे मुकाबला करता येतो.
एक काळ असा होता की त्रिपुरातल्या दहशतवादाला कंटाळून अनेकांनी या राज्यातून कायमचे स्थलांतर केले होते पण माणिक सरकार यांनी अतीशय कौशल्याने हा दहशतवाद आटोक्यात आणला. हाही एक धडाच आहे. कारण विविध राज्यांतला नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी केन्द्र सरकार आणि काही राज्य सरकारे मिळून प्रयत्न करीत असतानाही तो आटोक्यात येण्याऐवजी फोफावत चालला आहे. आता केन्द्राने माणिक सरकार यांचा सल्ला घेतला पाहिजे.
त्या सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य प्रति किलो दोन रुपये दराने देण्याची योजना यशस्वीपणे राबवली आहे. सामान्य माणसाला सरकारी मदतीचा आधार देणार्यान १५ प्रकारच्या योजना सरकारने राबवल्या आहेत आणि त्यातून दोन लाख २५ हजार लोकांना मदत मिळत आहे. डाव्या आघाडीचा असा कार्यक्रम जारी असताना राहुल गांधी या राज्यात प्रचाराला आले होते पण डाव्या सरकारच्या कार्यक्षमतेपुढे त्यांचा काहीही प्रभाव तिथल्या जनतेवर पडला नाही. त्यांनी जनतेला परिवर्तनाची हाक दिली पण लोकांना आहे ते सरकार बदलून परिवर्तन नको होते. त्यांनी काँग्रेस आणि त्याच्या दोन मित्रपक्षांच्या आघाडीला केवळ १० जागा दिल्या. त्यांनी नेहमीप्रमाणे राज्य सरकारवर निराधार आरोप केले. केन्द्र सरकार राज्याला पैसा पाठवते पण राज्य सरकार ते पैसे नीट वापरत नाही म्हणून राज्यातल्या सरकारला पराभूत करा असे आवाहन त्यांनी केले पण ती काही वस्तुस्थिती नव्हती.
मेघालयात मात्र काँग्रेसने राज्य राखले. २००८ साली या पक्षाला तिथे ६० पैकी २५ जागा मिळाल्या होत्या. आता ही संख्या २९ झाली आहे. स्पष्ट बहुमताला दोन जागा कमी पडल्या आहेत पण १३ अपक्षांतून दोन आमदार मिळणे काही अवघड नाही. पी. ए. संगमा यांचे आव्हान काँग्रेसपुढे होते पण त्याचा काहीही परिणाम काँग्रेसवर झाला नाही. नागालँडमध्ये नागा पीपल्स पार्टीने ६० पैकी ३८ जागा जिंकून आपली पकड कायम असल्याचे सिद्ध केले आहे. २००८ साली तिथे काँग्रेसला २३ जागा मिळाल्या होत्या. त्या आता कमी झाल्या असून काँग्रेसला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे काँग्रेसला नागालँडमध्ये पिछेहाट सहन करावी लागली आहे. सत्ताधारी नागा पीपल्स पार्टीने मात्र आपली स्थिती १२ जागा जास्त जिंकून सुधारली आहे. मेघालयात किंचित सुधारणा आणि अन्य दोन राज्यात पिछेहाट असे काँग्रेसचे यश आहे आणि तिन्ही राज्यात भाजपाच्या हाती भोपळा आला आहे.