नवी दिल्ली,
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याबाबतचा निर्णय आज होत असलेल्या पक्षाच्या बैठकित होण्याची शक्यता आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक शुक्रवारपासून सुरू होत आहे. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्राने दिली .
मोदीवर नवी जबाबदारी; भाजपची बैठक सुरु
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांचा विचार करुन कशा प्रकारे काम करायचे याची रणनीती या बैठकीत ठरविण्यात येणार आहे. ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक एका बंदीस्त खोलीत पार पडेल. त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत परिषदेचे देशातील सर्व सदस्य सहभागी होणार आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक राजनाथ सिंह यांनी भाजपचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच होत आहे. यामध्ये राजनाथ सिंह विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी दहशतवाद, नक्षलवाद, भ्रष्टाचार या संदर्भातील पक्षाची भूमिका ठरवली जाणार आहे. आगमी काळात कोणते नवे राजकीय कार्यक्रम हाती घ्यायचे हे देखिल ठरवले जाणार आहे. या बैठकीनंतर केंद्रीय पदाधिका-यांची नियुक्ती, मोदी आणि चौहान यांना द्यायच्या नव्या जबाबदा-या बाबतचा निर्णय घेऊन त्यांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्राने दिली.
