पुणे,दि.२८ – महाराष्ट्रात प्रबोधन पत्रकारितेला आरंभ केलेले पत्रकार व राज्यात पत्रकारांची व लेखकांची एक पिढी तयार केलेले संपादक श्री मुकुंदराव शंकरराव किर्लोस्कर यांचे आज दुपारी वयाच्या ९४ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन विवाहित कन्या आहेत. किर्लोस्कर उद्योगसमुहातील किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या तीन मासिकांचे ते दीर्घकाळ संपादक होते. त्यांनी या प्रकाशनातून अनेक पुस्तकेही प्रकाशित केली होती.
मुकुंदराव किर्लोस्कर यांचे पुण्यात निधन
उद्योजकता विकास व महिला सबलीकरण हे विषय सध्या अनेक ठिकाणी वापरात आहेत पण याला साठ वर्षापूर्वी आरंभ किर्लोस्कर मासिकांतून झाला. प्रस्थापित विचारांना धक्का बसविणारे अनेक विषय या मासिकांत सुरु झाले. प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रा. ना सि फडके, वि स खांडेकर यांचे अनेक विषय प्रथम या मासिकात आले. या मासिकांना आरंभ श्री शंकरराव किर्लोस्कर यांनी केला. आणि त्यांचा वारसा मुकुंदराव किर्लोस्कर यांनी समर्थपणे सुरु ठेवला. किर्लोस्करवाडी येथे सुरु झालेले हे प्रकाशन १९६०मध्ये पुण्यात आले. त्यांनंतर मनोहरचे साप्ताहिक रूपांतर झाले.
भारतात उद्योजकता सुरु व्हावी म्हणून औंधचे राजे भवानराव पंत प्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी शंभर वर्षापूर्वी किर्लोस्करवाडी येथे उद्योगसमुह सुरु केला व त्यांतूनच प्रकाशनाच्या या प्रकल्पाला आरंभ झाला.
