केंद्राच्या पथकाने आटोपला दुष्काळी दौरा

औरंगाबाद- राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी केंद्र सरकारकडून किती निधी दिला जाईल, याची निश्चिती करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा धावता पाहणी दौरा केला. या पथकाने कमी काळ शेतकर्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी चारा छावणी अन् फळबागांची पाहणी केली. दरम्यान या पथकाची पुणे येथे सयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ते सर्व परिस्थितीची चर्चा करून हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार असल्यचे समजते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पथकाने मराठवाड्यातील औरगाबाद,बीड, जालना या जिल्ह्याचा दौरा केला. दोन दिवस हे पथक पाहणी करणार होते. मात्र, अचानक दौरा बदलला आणि कोपरगावमार्गे शिर्डीला दर्शन घेऊन पथक पुण्याला रवाना झाले. १५ मोटारी आणि ३० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा धुरळा उडवत आला अन् गेला. सुभेदारीवरून पथक प्रमुख, केंद्रीय सहसचिव संजीव चोप्रा, मदत व पुनर्वसन विभागाचे राज्याचे उपसचिव प्रदीप इंदूरकर यांच्यासोबत विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, निवासी जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, वैजापूर नि गंगापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे, दोन्हीही तालुक्यांचे तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक असा ताफा होता.

पथकप्रमुखनी दोन चारा छावण्या, दोन फळबागा, एक कोरडी विहीर व एक मध्यम प्रकल्प याची पाहणी करण्यात घालवले. दौर्‍यात खोजेवाडी येथील चारा छावणी त्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर याच गावातील शेतकरी सुभाष थोरात यांची कमी पाण्यावर बहरलेली बाग दाखवण्यात आली. मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर कारभारी गायके यांची जळालेली बाग त्यांनी बघितली.

दौरा पथकानेच ठरवला होता, असा दावा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. भरत कदम यांनी केला.चोप्रा यांना मराठी भाषा अवगत नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांशी त्यांनी जी चर्चा केली, त्याचा इंग्रजी अनुवाद करून त्यांना सांगावा लागला. दरम्यान या पथकाची पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ते सर्व परिस्थितीची चर्चा करून हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार असल्यचे समजते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.